Chinchwad : उघड्यावर विकाल अंडे, तर पोलिसांकडून मिळणार डंडे

एमपीसी न्यूज – उघड्यावर अंडे, चायनीज खाद्यपदार्थ आणि दारू पिताना खाल्ले जाणारे तत्सम पदार्थ दारूच्या दुकानाशेजारी सर्रासपणे विकले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि उघड्यावर दारू प्यायल्यामुळे गुन्हे घडण्याची देखील शक्यता असते. यामुळे उघड्यावर अंडे आणि तत्सम पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हैद्राबाद येथे महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व निर्जन ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनेनुसार सर्वेक्षण सुरु असताना बुधवारी (दि. 4) मारुंजी येथील एका निर्जन ठिकाणी स्केटिंगपटूचा बियरचा बाटलीने गळा चिरून खून केल्याचे घटना समोर आली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी तळीराम पळवून लावण्यासाठी ‘स्पेशल ड्राइव्ह’ राबवण्याचे आदेश दिले. यामध्ये रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या कारची पोलीस झडती घेणार आहेत. यावेळी दारू पिताना आढळल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय हद्दीतील सर्व निर्जन स्थळांना पोलिसांच्या टीम रात्रीच्या वेळी अचानक भेटी देणार आहेत.

दारूच्या दुकानाच्या शेजारी भर रस्त्यावर, फूटपाथवर तसेच मोकळ्या जागेत बेकायदेशीर अंडे, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणारे स्टॉल लागलेले असतात. काही स्टॉल रस्त्यावर तर काही रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा होतो. एखाद्या वाहन चालकाने याबाबत विचारणा केली असता त्यांना मारहाण केली जाते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर उघड्यावर दारू प्यायल्यानंतर घरी जाताना अपघात आणि गुन्हे देखील होण्याचे प्रमाण जास्त असते.

दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचा आकडा वाढत आहे. तसेच दारू पिऊन वाहतूक पोलिसांशी व नागरिकांशी हुज्जत घातल्याचा देखील काही तक्रारी पोलीस दप्तरी दाखल होत आहेत. दारू विक्रेते परवाना दाखवून हात वर करतात. मात्र, दुकानाच्या बाहेर लावले जाणारे ‘चखणा स्टॉल’ यासाठी कारणीभूत ठरतात. उघड्यावर दारू पिणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “उघड्यावर दारू पिणारे, दारू पिऊन वाहन चालवणे अशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडे आधुनिक यंत्रणा असणार आहे. ब्रिथ अॅनालयजरच्या मदतीने संशयित लोकांची तपासणी केली जाणार आहे. ही कारवाई 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केली जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.