BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज – कार्यतत्पर पोलिसांमुळे अनेक अपराधी तात्काळ पकडले जातात. याचा प्रत्यय लोणी काळभोर परिसरात आला. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी मिळून आरोपींना पाठलाग करून पकडले. पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे खुनाच्या गुन्ह्याची नोंद होण्यापूर्वीच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

अशोक संतोष आडवाणी (वय 22, रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (वय 19, रा. वरवंड, दौंड), विजय संतोष पवार (वय 19, रा. वरवंड, दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. तर भारत राजू बढे (वय 24, रा. कासारवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भारत याचा संगमवाडी येरवडा येथे किरकोळ कारणावरून दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गोणीत झाकून तिघेजण वाघोलीकडून थेऊरकडे जात होते. त्यावेळी थेऊरगाव येथे पोलीस नाईक संदीप सुरेश देवकर यांनी तिघांना पाहिले. एका मोटारसायकल वरून चौघेजण जात असून त्यातील एकाचे डोके गोणीने झाकलेले आहे. तर एकाच्या शर्टला रक्त लागले आहे. याचा देवकर यांना संशय आला.

संशयाचा पाठपुरावा करण्यासाठी देवकर यांनी त्यांच्या सोबत असलेल्या दोन होमगार्डना सोबत घेतले आणि त्यांचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेऊरफाटा येथे गोणीने झाकलेल्या इसमाला रस्त्याच्या बाजूला टाकले. तिन्ही आरोपी यवतच्या दिशेने पळून जात असताना देवकर आणि होमगार्ड यांनी आरोपींना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3