Talegaon News : तळेगावकर कन्येच्या नेतृत्वाखालील महिला खो खो संघाचा राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज – नुकत्याच जबलपूर येथे राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा पार पडल्या. तळेगावची कन्या प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने या स्पर्धेत बाजी मारली आहे. महाराष्ट्र महिला खो खो संघ विजेता ठरला. तर पुरुष प्रकारात रेल्वे खो खो संघ विजेता आणि महाराष्ट्र पुरुष खो खो संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

जबलपूर येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत महिला खो खो संघाला विजेतेपद मिळाले. महाराष्ट्र महिला संघाला यावर्षी 23 वे विजेतेपद मिळाले आहे. तर महाराष्ट्र पुरुष खो खो संघाला यावर्षी उपविजेतेपद मिळाले. पुरुष रेल्वे संघाने विजेता पदावर आपली मोहोर उमटवली आहे.

महाराष्ट्र महिला खो खो संघाचे नेतृत्व तळेगावची कन्या प्रियंका इंगळे हिच्याकडे होते. प्रियंका तळेगाव मधील इंद्रायणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकलेली महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असला तरी विजेत्या रेल्वेच्या संघात 12 पैकी 11 खेळाडू महाराष्ट्राचे आहेत, ही बाबही अभिमानाची असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठीचा एकलव्य पुरस्कार जिंकणाऱ्या रेल्वेच्या महेश शिंदे याचे तसेच तृतीय क्रमांक विजेत्या कोल्हापूरच्या पुरुष संघाचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. वेग, चपळता, निर्णयक्षमतेचा कस पाहणाऱ्या खो-खो खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे इथल्या मातीचंच वैशिष्ट्य असल्याचंही उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.