Bhosari : तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार

आळंदी रोड येथील घटना, मित्राला मारल्याच्या रागातून केली मारहाण

एमपीसी न्यूज -मित्राला मारल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तरुणाला निर्जनस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वादहाच्या सुमारास हुतात्मा चौकाजवळ आळंदी रोड येथे घडली.

वीरेंद्र विश्वनाथ चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी तरुणाचे वडील विश्वनाथ दत्तू चव्हाण (वय 42, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोशन सवडतकर (रा. सँडविक कॉलनी समोर, दिघी रोड, भोसरी), वैभव मोरे (रा. भारत माता नगर, सहकार कॉलनी, दिघी), हृतिक रसाळ (रा. गुळवे मैदान, भोसरी), प्रज्वल कोलते (रा. हुतात्मा चौक, दिघी रोड, भोसरी), सोन्या जगताप (रा. सायगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा वीरेंद्र याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून हुतात्मा चौकाच्या आत, हनुमान कॉलनी येथे महापालिकेच्या मोकळ्या जागेत नेले. तिथे वीरेंद्र याला आरोपींनी त्यांच्या मित्राला का मारले? अशी विचारणा केली. वीरेंद्र याने आरोपींच्या मित्राला मारले नसल्याचे सांगितले. तरीही संशयित आरोपींनी वीरेंद्रला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी रोशन याने लाकडी दांडक्याने तर ढोरे याने लोखंडी कोयत्याने वीरेंद्र याच्या पाठीवर, हाताच्या पोटरीवर, डाव्या पायाच्या टाचेवर, मांडीवर वार केले. यामध्ये वीरेंद्र गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.