Pimpri : युवकांनी लोकल नव्हे ग्लोबल स्पर्धा करावी – राकेश जैन

जेएसओचे पाचवे राष्ट्रीय युवा संमेलन संपन्न

एमपीसी  न्यूज – युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग, व्यवसाय सुरु करुन देशाच्या विकासात हातभार लावावा. मात्र उद्योग-व्यवसाय करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीने उद्योग- व्यवसाय करण्याचे दिवस संपले आहेत. कारण सध्या ‘लोकल नव्हे ग्लोबल स्पर्धा’ आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण सर्व बाजूंनी सुसज्ज झाले पाहिजे. युवा उद्योजकांनी व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे, असे मत इंदूर येथील जेष्ठ व्यावसायिक मार्गदर्शक राकेश जैन यांनी व्यक्त केले. 

निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनचे (जेएसओ) पाचवे अखिल भारतीय जैन युवक संमेलन रविवारी संपन्न झाले. ‘उद्योग-व्यवसायात प्रगती’ या विषयावर युवकांना आणि उद्योजकांना राकेश जैन यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ते बोलत होते.

उद्योजक प्रकाश रसिकलाल धारिवाल, दिना प्रकाश धारिवाल, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहरलाल लोढा, निमंत्रक नितीन बेदमुथा, प्रकाश सांकला, बाळासाहेब धोका, सुनील नहार, सुरेश गादीया, मोहन संचेती, सुरेश शेठीया, जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा आदींसह देशभरातून आलेले जेएसओचे प्रतिनिधी व जैन बधू, भगिनी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.

पवित्र चातुर्मासानिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब, प. पू. प्रफुल्लाजी म. सा., प.पू. हंसाजी म. सा., प. पू. पुनितीजी म. सा., प. पू. गरिमाजी म. सा., प. पू. महिमाजी म. सा. यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत. प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या संमेलनात जेएसओचे देशभरातून सातशे युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी हेमंत गुगळे यांना युवारत्न पुरस्कार, राजेंद्र मुथा यांना युवाभुषण पुरस्कार, मनोहरलाल लोढा यांना समाजभुषण आणि उद्योजक प्रकाश धारिवाल यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच समाजातील यशस्वी व्यावसायिकांना बेस्ट मॅनेजमेंट पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले.

राकेश जैन म्‍हणाले की, आजच्या युवकांना ज्येष्ठ उद्योजकांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नवनवीन आधुनिक संशोधनामुळे जग वेगाने बदलत आहे. त्यावेगाने उद्योग व्यवयायिकांनी बदल आत्मसात करणे आवश्यक आहे. ‘बदलेंगे तो बढेंगे’ हे आजच्या यशाचे गमक आहे. परिस्थिती पहिल्या सारखी राहिलेली नाही. आपल्या शेजारचा स्पर्धक काय करतोय यापेक्षा इतर देशातील स्पर्धक काय करतात. याचा अचूक अंदाज आपल्याला आला पाहिजे. कारण हि स्पर्धा लोकल नव्हे तर ग्लोबल झाली आहे. एकाच प्रकारचे उत्पादन, विक्री, सेवा विविध देशांतून अनेक कंपन्या देत असतात. अशी एकापेक्षा एक सरस असलेली उत्पादने, सेवा आपले स्पर्धक ग्राहाकांना घरपोहच देत आहेत. अशावेळी आपण केवळ लोकल स्पर्धेत गुंतून राहिलो तर ग्लोबल स्पर्धक आपल्या पुढे निघून जातील. त्यासाठी नावीन्याचा ध्यास घेत, तंत्रज्ञानाचा वापर करीत, बदलांचा स्वीकार केला पाहिजे. असे जैन म्हणाले.

प्रकाश धारिवाल म्‍हणाले की, प्रामाणिपणा, सचोटी आणि अचूक व्यवस्थापन, कमी मनुष्यबळ यामुळे यश गाठता येते.  तुमचे उत्पादन काय आहे, हे जितके महत्वाचे आहे, त्याहीपेक्षा ते तुम्ही ग्राहकांपर्यंत किती वेळात कसे पोहचवता याला अधिक महत्व आहे. उत्पादन चांगले आहे मात्र ते वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचले नाही आणि विक्री पश्चात सेवा चांगली दिली नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.

निमंत्रक नितीन बेदमुथा म्‍हणाले की, युवकांनी जेष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांचा अनुभव आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून बदल अंगिकारले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच यश मिळेल. उद्योग-व्यवसायातील बदल शोधण्याची क्षमता आपल्याकडे विकसित होणे आवश्यक आहे. संमेलनाच्या आयोजनात सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांनी विशेष सहकार्य केले.

प्रास्ताविक विनोद मुथा, शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन तर आभार तुषार मुथा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.