पिंपरीतील केबल घोटाळ्यात अडकलेल्या 11 अभियंत्यावर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रिय हद्दीतील आणि वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात व शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणा-या उच्च व लुघुदाब वीजवाहिन्या हलविण्याच्या कामात अनियमिता केल्याप्रकरणी पालिकेच्या 11 अभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिका-यांचा समावेश आहे.

महापालिका विद्युत विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता एकनाथ पाटील, माणिक चव्हाण, नितीन देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश कातोरे, दमयंती पवार, महेश कावळे, अकबर शेख, अशोक अडसुळे अशी कारवाई केलेल्या 11 अभियंत्यांची नावे आहेत.

‘क’ क्षेत्रिय हद्दीतील तसेच वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात आणि शहर सुशोभिकरणात अडथळा ठरणा-या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने केबल गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानंतर काही अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यानुसार चौकशी करुन प्रशासानाने संबंधित अधिका-यांकडून पालिकेचे झालेले नुकसान वसूल केले होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवृत्त विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यावर ठपका ठेवला आहे. केबल गायब होण्याच्या प्रकरणात सुरगुडे यांनी निष्काळीजपणा आणि कर्तव्यात कसून केल्याने त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मिलिंद कपिले यांच्या निवृत्तीवेतनातील पाच टक्के भाग एक वर्षापर्यंत रोखून ठेवले जाणार आहे. तर, उर्वरित नऊ उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखून ठेवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.