BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व अन्य आंबेडकर विचाराच्या संघटनांतर्फे नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्षा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा अँड रंजना भोसले, सचिव किसन थूल यांनी केले. या मोर्चात नाना भालेराव, किरण साळवे, भारतीय बौध्द समाज महासभा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, वांछित बहुजन आघाडी, बामसेफ, बहुजन समाजवादी पार्टी, भटक्या विमुक्त जमाती, कष्टकरी संघटनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

नगर परिषदेच्या प्रवेशव्दारावर झालेल्या सभेत मधुकर भालेराव, अमर चौरे, आर. दि. जाधव, संगीता कदम, आरती पंडागळे, इमाम शेख, माऊली सोनावणे, नाना भालेराव, कोंडीबा रोकडे व अँड रंजना भोसले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. नगरपरिषदेकडून उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.व येणा-या सर्वसाधारण सभेत निवेदनातील सदर मागण्याचा विषय घेण्याची विनंती करण्यात येईल असे आश्वासन दिले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक होण्याची प्रक्रिया त्वरित पार पाडावी, निवास्थानाच्या बाजूला असणारे रिकामे प्लॉट संपादित करावे.व त्याचा समावेश स्मारकासाठी करावा, प्लॉट संपादित होत नाही तो पर्यंत त्याला विकसनाची परवानगी देऊ नये. स्मारकाच्या निवासस्थानाची डागडुजी व दुरुस्ती करण्यासाठी आलेला शासनाचा निधी त्वरित स्मारकासाठी वापरण्यात यावा. यासाठी विशेष सभेचे नियोजन करावे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

किसान थूल यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी केले. आभार ऍड रंजना भोसले यांनी मानले. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3