Pune : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. धनकवडी येथे झालेल्या अपघातात पाठीमागून वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर लोहगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुराला डंपने धडक दिली. त्यात या मजुराचा मृत्यू झाला.

अमित प्रकाश वैद्य (वय 39, रा. रक्षालेखा सोसायटी, धनकवडी) आणि लक्ष्मण धर्मा राठोड (वय 38, रा. वडगाव शेरी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

धनकवडी येथील शेवटच्या बसथांब्याकडून एक कार गुलाबनगरच्या दिशेने भरधाव येत होती. वैद्य हे आपल्या परिवारासह दवाखान्यातून औषध घेऊन येत असताना त्यांना कारची धडक बसली. नागरिकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान वैद्य यांचा मृत्यू झाला. दरम्यान कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. चौकासमोरील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत राठोड हे वडगाव शेरी भागात पत्नीसह राहत होते. ते मोलमजुरीचे काम करत असत. गुरुवारी (दि. 19) पहाटे साडेपाच वाजता ते कामासाठी लोहगाव परिसरात आले होते. पाऊस पडत असल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर डंपरचालक पसार झाला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. गिरी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.