Talegaon Dabhade : फडणवीस सरकारच्या माध्यमातून नव्या महाराष्ट्राची निर्मिती- राज्यमंत्री अनुराग ठाकूर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राची जनता विकासावर विश्वास ठेवणारी आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली इमानदार सरकारचे काम केले आहे. एकीकडे नव्या भारताचा उदय होत असून नव्या महाराष्ट्राची निर्मिती देखील फडणवीस सरकारच्या माध्यमातून होईल, असा असा विश्वास केंद्रीय अर्थ व कार्पोरेट अफेअर राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्यातील निवडणुकीसाठी भाजपाचे केंद्रिय प्रभारी म्हणून ते दौ-यावर आले असताना राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या निवासस्थानी तळेगाव दाभाडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, युवक अध्यक्ष संदीप काकडे आदि उपस्थित होते.

राज्यात देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2/3 बहुमताने सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, मावळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या खूप मोठ्या संधी आहेत. राज्यमंत्री संजय भेगडे हे युवा आणि विकासाची जाण असलेले नेते आहेत. निवडणुकीनंतर त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल. ते युवा आणि विकासात विश्वास ठेवणारे सक्षम आमदार, मंत्री आहेत. इथल्या लोकांनी विकासाची जी स्वप्ने पाहिली आहेत ती ते पूर्ण करतील,

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, या घोटाळ्यास बँकेचे संचालक सर्वस्वी जबाबदार आहेत. रिझर्व बँक गंभीरतेने योग्य ती पावले उचलत आहे. माध्यमातून जेंव्हा घोटाळ्याचा प्रकार समोर आला तोपर्यंत लेखापाल काय करत होते ? ही चिंतेची बाब आहे. बँकेचे संचालक, अधिकारी यांचा कसून तपास आरबीआय करत असून त्याच्या मूळापर्यंत गेले पाहिजे.

अनुराग ठाकूर यांनी 370 कलम, तीन तलाख आदि निर्णयांचा सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की लेह आणि काश्मिरच्या दौ-यात तेथील लोक याबाबत आनंदी असून मोदीच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. काश्मिर भारतात समावेश होण्याच्या महाराजा हरिसिंग यांच्या निर्णयाला डावलून पंडित नेहरूनी घेतलेला निर्णय आत्मघातकी होता. त्यामुळे तेथील तीन पिढ्यांच्या विकासाच्या आशांपासून ते वंचित राहिले. नेहरूंना त्यांचे राज्य सोडून मृत्यूपर्यंत मुंबईचा आसरा घ्यावा लागला. मोदींनी घेतलेल्या निणर्यांमुळे नेहरूंना खरी श्रध्दांजली मिळाली आहे.

पाच ट्रिलियन डॉलर हा चुनावी जुमला तर राहणार नाही ना ? असे विचारले असता ते म्हणाले, की मोदींनी गेल्या पाच वर्षात 36 कोटी लोकांची बँक खाती उघडलीत, आठ कोटी परिवारांना गॅस सिलेंडर कनेक्शन्स दिलीत, प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे, राष्ट्रीय महामार्गाचा विकास तीनपटीने सुरू आहे. त्यामुळे या विकासाच्या केवळ दावे किंवा घोषणा नसून प्रत्यक्षात केलेले काम आहे. लोकांना याची जाणीव असल्याने महाराष्ट्रातील निवडणुकीतही मोठा जनाधार भाजपाला मिळेल.

कॉर्पोरेट जगतासाठी करात मोठी सवलत दिल्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, सामान्यजनतेसाठी पाच लाखापर्यंतची करमुक्तीची मर्यादा, लघु व सुक्ष्म उद्योगांना कर आणि कर्जदरात दिलेल्या सवलतीमुळे रोजगाराच्या अनेक संधी नजिकच्या काळात निर्माण होणार आहेत. की जगभरात कॉर्पोरेटचे टॅक्सदर कमी आहेत. करसवलतीमुळे होणारी वित्तीय तूट कशी भरून काढणार असे विचारले असता ठाकूर म्हणाले, की काँग्रेसच्या काळात वाढलेली कर्जे, महागाई आणि विकासाचा दर याबाबत मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

कॉग्रेसच्या काळातील महागाईचा 12 टक्के दर आज 3.5 टक्क्यावर आणला आहे. वित्तीय तूट त्यांच्या काळात साडेपाच टक्के होती ती कमी करून साडेतीन टक्क्यावर आणली आहे. भ्रष्टाचाराला पूर्ण पायबंद घातला असून महागाई रोखण्यात देखील यशस्वी कामगिरी केली आहे. नजिकच्या काळातील आर्थिक विकासाची उद्दिष्टे जशजशी पूर्ण होत जातील, तसतशी वित्तीय तूट देखील भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परदेशातील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि चीनसारख्या मातब्बर अर्थव्यवस्थेकडे आयातीतून जाणारा पैसा भारतात वळविण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. त्यामुळे भारताची 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.