Maval : मावळ तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज- मावळातील रस्त्यांची गेल्या 10 वर्षांत दुरवस्था झाली असून आमदार झाल्यानंतर आपण अग्रप्राधान्याने रस्ते विकासाचे काम हाती घेणार आहे. ‘खड्डेमुक्त रस्ते’ हा आपला मावळवासीयांना शब्द आहे, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री महागाव येथे बोलताना दिला.

सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री शेवती वसाहत, महागाव, सावंतवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाची वाडी, काले आदी गावांमध्ये प्रचारदौरा करून मतदारांशी संवाद साधला.

शेळके म्हणाले की, चांगल्या रस्त्यांमुळे परिसरातील विकासाचा मार्गही प्रशस्त होतो, मात्र दुर्दैवाने रस्ते विकास तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मावळवासीयांनी आता परिवर्तनाच्या बाजूने कौल देण्याची गरज आहे. आपण आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पाळलेला आहे. त्यामुळे मावळवासीयांनी आपल्याला तालुक्याचा विकास करण्याची एकदा संधी द्यावी.

ग्रामसभेप्रमाणे तालुक्याची आमसभाही असते हे आजपर्यंत मावळच्या जनतेला ठावूक नाही, अशी टीका शेळके यांनी केली. आपल्याला हॅटट्रिकची गरज नाही आणि हॅटट्रिक करायला हा काही क्रिकेटचा सामना नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त बिगारी मावळात आहेत. आपल्या शेतकरी बांधवांना बिगारी बनवले गेले आहे, असा आरोप शेळके यांनी केला. ही लढाई जनशक्ती विरूध्द धनशक्ती अशी आहे, असे त्यांनी सांगितले.

महागाव शाळेला विचार न करता सुनीलआण्णांनी त्वरित आर्थिक मदत केली आणि शाळेचे कामही झाले. गावातील पाणी शुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात केली ज्यांनी शब्द दिला त्यांनी सुरुवात ही केली, असे महागावच्या ग्रामस्थांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सुनीलआण्णांचे विशेष आभार मानले. गेली 10 वर्षे सत्ता असूनही विद्यमान आमदारांनी गावच्या कामांना एकदाही साधा हात लावला नाही, असे सांगून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महागावच्या सर्व वाड्या-वस्त्यावर सुनीलआण्णा यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

शेवती वसाहत येथे निखिल कालेकर, सुनील कालेकर, गणेश कालेकर, सुरेश कालेकर, राजेश राऊत, मोहम्मद शेख,अल्ताफ शेख यांनी तर महागाव सावंतवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाचीवाडी येथे संजय वि. तिकोणे, माऊली निकम, इंद्रजित पडवळ, बजरंग घारे, रामदास घारे, दत्तात्रय पडवळ, भिकू तिकोणे, नंदा तिकोणे (पाटील), विश्वनाथ डोंगरे, हनुमंत निकम, रोहिदास होजगे, विनायक सावंत, अंकुश भालेसईन, विश्वनाथ भालेसईन आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.