Wakad: ‘पाणी नाही, मतदान नाही’, गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांचा पवित्रा

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणा-या वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘पाणी नाही, मतदान नाही’ हे अभियान सुरु केले आहे. यामध्ये वाकडमधील सुमारे तीन हजार गृहनिर्माण सोसायट्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चिंचवडमधील उमेदवाराच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत.
वाकडचा भाग झपाट्याने विकसित होत आहे. मोठ-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या होत आहेत. वाकड परिसरात राहण्यासाठी नागरिकांची पसंती मिळत आहे. बाजूला हिंजवडी आयटी-पार्क असल्याने उच्चभ्रू लोकांचे वाकडमध्ये वास्तव्य वाढले आहे. या परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसयट्यांमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन वापरासाठी पाण्याचे टँकर खरेदी करावे लागतात.
अपु-या पाणीपुरवठ्याबाबत नागरिक सातत्याने आवाज उठवित आहेत. आंदोलन देखील केली आहेत. परंतु, पाण्याचा प्रश्न काही संपला नाही. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी तीन हजार गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी ‘पाणी नाही, मत नाही’ हे अभियान सुरु केले आहे.
त्यामुळे निवडणुकीत वाकडमधील विस्कळीत पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याचा फटका सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.