Pune : 19 वा शनिवारवाडा नृत्य महोत्सव रविवारी

एमपीसी न्यूज – शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचा मनोहारी मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य महोत्सव रविवारी ( दि. 16 फेब्रुवारी) सायंकाळी 6.30 वाजता ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. गणेशवंदना, भरतनाट्यम् व कथ्थकनृत्याविष्कार हे यंदाचे वैशिष्ट्य आहे.

यामध्ये गुरु शुमिता महाजन यांनी त्यांच्या साधना नृत्यालयाच्या विद्यार्थिनींसमवेत सादर केलेली गणेश वंदना, वारकरी संप्रदायाची महती भरतनाट्यम् नृत्यातून साकारणारे वैभव आरेकर आणि सहकलावंत यांच्या कार्यकम आणि दिल्ली येथील नृत्य गुरुअभिमन्यू लाल आणि विधा लाल यांनी सहकलावंतांसोबत सादर केलेला कथ्थक नृत्याविष्कार ही यंदाची शनिवारवाडा नृत्य महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. शनिवारवाडा नृत्य महोत्सवसंयोजन समितीच्या अध्यक्षा सबीना संघवी आणि सदस्य गायत्री देवी पटवर्धन, नीलम सेवलेकर आणि  मौसमी सणस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रोझरी स्कूलचे प्रिन्सिपल विनय अरहना (Vinay Arahna) यावेळी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने या नृत्य महोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर आदि शंकराचार्य विरचित गणेशपंचरत्न स्तोत्रम व त्यानंतर म्हैसूरचे राजे जयचामराजेंद्र वडियार यांनी रचलेली महागणपतीं भजेहम ही रचना गुरु शुमिता महाजन सादर करतील. त्यांच्या साधना नृत्यालयाच्या सहकलावंत साथ करतील. यानंतर सांख्य डान्स कंपनीचे वैभव आरेकर सहकलावंतांसह ‘अभंग रंग’ कार्यकम सादर करतील. त्यामध्ये गणपती व प्रभू रामचंद्र यांची अभंगांच्या माध्यमातून केलेली भक्ती वमहाराष्ट्राच्या संत परंपरेचे मानबिंदू असणार्‍या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या वारकरी संप्रदायाच्या विचारांचे दर्शन भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर होईल. याची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन वैभव आरेकर यांचे असून संगीत रचना अरुणा साईराम, के. ए. गणेशन, जयंत नेरळकर आणि अंबिका विश्वनाथ यांचे आहेत. प्रकाशयोजना व वेशभूषा सुशांत जाधव यांची आहे.

नंतर दिल्लीचे नृत्य गुरु अभिमन्यू लाल आणि विधा लाल हेसहकलावंतांसमवेत कथ्थक नृत्याविष्काराद्वारे ‘सृजन’ हा मुख्य कार्यकम सादर करतील. पुण्यात प्रथमच ते आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. त्यामध्ये संत दयानंद सरस्वती यांनी लिहिलेली व गीतांजली लाल यांनी रचना केलेली शिवस्तुती ‘शिवशक्ती’ सादर होईल. यामध्ये जटाधारी शंकराच्या जटांमधून अवतरण झालेली गंगा, चंद्र व तारे हे त्यांचे अलंकार, एका हातात डमरु, एका हातात त्रिशूल व गळ्यात नाग अशी शंकराची विलोभनीय प्रतिमा येथे सादर होईल.

पारंपरिक स्वरुपातील कथ्थक नृत्यामध्ये जयपूर घराण्याचे संथ लय आणि दृत लय यांमध्ये सादर केलेले शुद्ध कथ्थक नृत्य सादर होईल. रंगांच्या उत्सवाचे सादरीकरण असणार्‍या ‘होरी’ कार्यक्रमात राधा व कृष्ण या व्यक्तीरेखांसोबत आनंदाची अनूभूती देणार्‍या रंगांच्या माध्यमातून एकरुपतेचे दर्शन घडेल. कथ्थकच्या माध्यमातून सादर होणार्‍या प्रेमकथा ‘अलबेला साजा’मध्ये प्रियकराशी अतीव आर्ततेने एकरुप होणारी प्रेयसीची प्रेमकथा सादर होईल. या नंतर ‘ऐसो हटीलो छैला मग रोकता है’  या राग देशवर आधारित ठुमरीमधून बालकृष्णाच्या लीलांचे अनोखे दर्शन घडेल. राधा आणि गोपींची वाट अडवून त्यांच्या डोक्यावरील मातीची मडकी फोडून दूध आणि दही खाणार्‍या बालकृष्णाची तक्रार माता यशोदेकडे केली जाते. हे कथ्थक नृत्याविष्कारातून प्रभावीपणे दाखविले जाईल.

कथ्थकच्या माध्यमातून पावसाळ्याचे दृष्य उभे करणार्‍या ‘वर्षा मंगल’मध्ये हातांच्या मुद्रा व पदन्यासाच्या आधारे झाकोळून आलेले काळे ढग, विजांचा कडकडाट आणि पावसाचे तुषार या ओल्या चिंब वातावरणात राधा व कृष्ण यांचे मीलन दाखविले जाईल. या सर्व ‘राग दरबारी’ आधारित रागासोबत मनोहारी पदन्यासाच्या आधारे हिंदुस्थानी संगीतातील तराना सादर केला जाईल. या सर्व अत्यंत प्रभावी उपकथानकांच्या आधारे सादर होणारा कथ्थक कलाविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.