Pune : कलाकार आतून घडला की त्याची कलाही घडत जाते –रीला होता

एमपीसी न्यूज – “योग्य गुरु शोधून त्यांच्या कडून नृत्याचे तंत्र शिकून घ्यावे, ते पक्के करावे. गुरूच्या सानिध्यात त्यांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा. मात्र ,नंतर आपण मुळात काय आहोत?, अपाली प्रेरणा ओळखून स्वतःला जाणून घेत काम करायला हवे. कलाकार स्वतःला विकसित करण्यासाठी, स्वतःत क्रांती घडविण्यासाठी साधना करत असतो, असे मला वाटते. तसे झाले तरच आपली कलाही घडत जाते आणि कलेतील सकारात्मकता रसिकांपर्यंत पोहचू शकते.” असे मत प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रीला होता यांनी व्यक्त केले.

’67व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा एक भाग असलेल्या ‘अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमात शनिवारी शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पूर्वा शहा यांनी रीला होता यांची मुलाखत घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. सवाई गंधर्व स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. रीला होता या ज्येष्ठ नृत्यांगना माधवी मुदगल व केलूबाबू यांच्या शिष्या आहेत. शिवाय त्यांनी त्यांच्या आई बिजोय लक्ष्मी यांच्याकडूनही योगाचे धडे घेतले आहेत.

रीला होता म्हणाल्या, “तुम्ही तंत्र शिकून कलाकार म्हणून श्रेष्ठ होतात; पण कलेद्वारे आतून तुम्ही माणूस म्हणून किती घडतात हे कलेसाठीदेखील फार आवश्यक आहे. मी जशी आतून घडत गेले तसे ते माझ्या नृत्यातून व्यक्त होऊ लागले. यासाठी मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, कलाकाराकडून, प्रसंगातून आणि माझ्या आतून मला प्रेरणा मिळत राहते.”

_MPC_DIR_MPU_II

त्यांना नृत्यच आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडण्याची प्रेरणा गुरु माधवी मुदगल यांच्याकडून मिळाली. त्यांच्याकडून नृत्य, संगीत, ताल, प्रकाश योजना या प्रत्येकच क्षेत्रात काटेकोर असण्याची सवय व वळण लागले. आपल्या गुरूंच्या नृत्यरचना पारंपरिक असल्या तरी त्यात कायमच नाविन्य होते, असेही त्यांनी सांगितले. गुरु केलूबाबू यांच्याकडून ‘शिकणे कधी बंद करू नये, वय, लिंग किंवा अन्य कोणत्याही गोष्टी आड न येऊ देता शिकत राहावे’, हे शिकल्याचेही त्यांनी मोठ्या विनम्रतेने सांगितले.

आपल्या कलाकृतींविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “माझा पाया योगाचा, अध्यात्माचा आहे. नृत्य आणि योग यांचा फार जवळचा संबंध आहे. योगासनातील बऱ्याच मुद्रा नृत्यातही आहेत. जीवनाचा असो, नृत्याचा असो किंवा शरीराचा असो समतोल साधण्यासाठी योगाचा फार मोठा आधार असतो. त्यामुळेच माझ्या कलाकृतींमध्ये अध्यात्म, तत्वज्ञान यांचा समावेश असावा असे मला वाटते. त्यासाठी माझ्या आईची मला मदत होते.

माझी अशीच एक कलाकृती म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील ‘रवींद्र अभिव्यक्ती’. मला असे वाटते की ते कवितेतून केवळ शब्द मांडत नसे तर त्यात एक छुपे अध्यात्म असे. ते अध्यात्म मी माझ्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नृत्यरचना साकारताना मी त्यातील पात्रांचा अभ्यास करून त्याला योग्य ती नृत्यशैली मी निवडते. मग कधी परदेशी कलाकार व नृत्यशैलींचाही अंतर्भाव केला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.