…घरात अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीची सुखरुप सुटका!

एमपीसी न्यूज – दीड वर्षाची चिमुकली घरामध्ये खेळत होती….. आई स्वच्छतागृहामध्ये गेली होती…. खेळता-खेळता मुलगी स्वच्छतागृहाजवळ आली आणि तिने स्वच्छतागृहाची बाहेरून कडी लावली… त्यामुळे आई आणि मुलगी दोघीही घरामध्ये अडकल्या. अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी घराच्या मुख्य दरवाजाला छिद्र पाडले. घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि माय-लेकरांची सुखरुप सुटका केली. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पिंपरी येथील आत्मनगर सोसायटीमध्ये घडली.

सानवी अनिल खाळकर (दीड वर्ष) या मुलीची आणि तिच्या आईची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

खाळकर कुटुंबीय पिंपरी, आत्मनगर येथील सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी सानवी आणि तिची आई दोघीच घरात होत्या. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सानवीची आई स्वच्छतागृहामध्ये गेली होती. सानवीने खेळता-खेळता स्वच्छतागृहाला बाहेरून कडी लावली. त्यामुळे आई आणि सानवी दोघीही घरामध्ये अडकल्या. सानवी जोरात रडत होती. आईची घालमेल सुरू होती. नागरिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे जवान नितीन कोकरे, विठ्ठल घुले, अनिल माने, लक्ष्मण ओव्हाळ, अंकुश बढे त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजी कठावणीच्या सहाय्याने छिद्र पाडले आणि घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला. माय-लेकरांची सुखरूप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.