सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चरित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

एमपीसी न्यूज – इस्रोच्या पीएसएलव्ही सी-37 या महत्त्वकांक्षी मोहिमेच्या ऐतिहासिक कामगिरीच्या दिवशीच भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या चरित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कर्तृत्वगाथा रुपेरी पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. ‘रेती’ चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चरित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘ए.पी.जे.’ याच नावाने पडद्यावर येणाऱ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे.

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाम यांच्या चरित्रपटाचे पहिले पोस्टर पोस्ट केले आहे. पोस्टरवरील ‘एव्हरी एज हॅज अ हिरो, एव्हरी हिरो हॅज अ स्टोरी’ ही ओळ कलामांची उपलब्धी स्पष्ट करणारी आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी भाषेतील चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचा उल्लेख देखील आदर्श यांनी केला आहे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे काम केले आहे. 

एका लहानशा गावातील मुलाचा संघर्ष, शिक्षणाच्या बळावर एक मोठा वैज्ञानिक आणि त्याहीपुढे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या कलामांची कथा परिचित असली तरी अजूनही दुर्लक्षित राहिलेली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून ही सुंदर, प्रेरणादायी कथा लोकांसमोर आणण्याचा आपला हेतू असल्याचे प्रमोद गोरे यांनी यापूर्वी सांगितले होते. या चित्रपटासाठी त्यांनी रामेश्वरमला भेट दिली. कलाम यांच्या बंधूंचीही त्यांनी भेट घेतली. कलाम यांच्या कुटुंबियांची परवानगी घेऊनच पुढचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले होते.

‘ए.पी.जे’ची कथा जितकी प्रभावी आहे तितकेच त्यांचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणे ही गोष्टही सोपी नाही. म्हणूनच या भूमिकेसाठी प्रमोद गोरे यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही गाजवणाऱ्या इरफान खानला विचारणा केल्याची देखील माहितीसमोर आली होती. इरफान ही भूमिका करणार की नाही, याबद्दल अजून निश्चित काही कळले नसले तरी इरफान किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी हे दोघेच त्यांच्या भूमिकेचे आव्हान पेलू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. 

‘द गांधी’ हा आपल्याकडचा आजवरचा सर्वोत्तम चरित्रपट आहे. रिचर्ड अटेनबरो यांनी ज्या ताकदीने तो चित्रपट केला त्याच प्रभावीपणे कलाम यांच्यावरच्या चित्रपटाची हाताळणी असायला हवी आणि म्हणूनच हॉलीवूड दिग्दर्शकाकडे हा चित्रपट सोपवण्याचा विचार करत असल्याचे गोरे यांनी म्हटले होते.

spot_img
Latest news
Related news