बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

लोणावळा नगरपरिषदेचे प्रियदर्शनी संकुल बनलय दारुडे व गर्दुले यांचा अड्डा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहराच्या मध्यभागी भागात असलेले नगरपरिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे. संकुलाच्या पायऱ्या व कोपरे हे दारुच्या बाटल्या व व्हाईटनरने भरलेल्या असल्याचे विदारक चित्र नुकतेच मनविसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कायम या संकुलाकडे दुलर्क्ष झाले असल्याने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या संकुलाची पूर्णपणे वाताहात झाली आहे.

शहराच्या मध्यवर्ती गावठाण भागात लोणावळा नगरपरिषदेने प्रियदर्शनी नावाने व्यापारी संकुलाची उभारणी 1995 साली केली आहे. व्यापारी गाळे, विविध कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद प्राथमिक शाळा, शिक्षण मंडळाचे कार्यालय, पतसंस्था या संकुलात आहेत. या  संकुलाचे बांधकाम करताना योग्य खबरदारी घेतली न गेल्याने इमारतीच्या हॉलमध्ये आवाजाची समस्या निर्माण झाल्याने हे हॉल वापराविना बंद अवस्थेत होते. मागील सहा महिन्यांपूर्वी शिवदुर्ग मित्र संस्थेने येथील बंद अवस्थेत असलेल्या सदरच्या हॉलमधून 4 ट्रॉल्या कचरा बाहेर  काढत शहरातील मुलांच्या करिता इनडोर गेम्स सुरू केल्या आहेत.

मात्र, या संकुलाची सुरक्षा आजही रामभरोसे असल्याने सर्व कार्यालये बंद झाल्यानंतर संकुलाच्या परिसरात दारुडे, गर्दुले व अपप्रवृत्ती धारकांचा अड्डा भरतो. संकुलाच्या मोकळ्या जागा, पॅसेज, पायऱ्यांवर सर्रासपणे ही मंडळी नशा करतात, मोकळ्या दारुच्या बाटल्या व इतर वस्तू तेथेच टाकतात, पायऱ्यांवर लघुशंका करत असल्याने परिसर बकाल झाला आहे. पायऱ्यांवरून संकुलात जाताना लघुशंकेच्या वासाने जीव नकोसा होतो. नगरपरिषदेच्या वतीने संकुलाच्या सुरक्षिततेकरिता सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, हे सुरक्षारक्षक दिवसा एक ठिकाणी व रात्री एक ठिकाणी काम  करत असल्याने ते बहुधा झोपलेले असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले आहेत.

नगरपरिषदेच्या मालमत्तेची दुलर्क्षितपणामुळे झालेली ही दुरावस्था सध्या चर्चेचा विषय आहे. संकुलाच्या परिसरात चुकीचे उद्योग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिले आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी देखील मागील काळात अनेक वेळा या संकुलाच्या दुरावस्थेबाबत सभागृहात संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जाधव या जनतेमधून नगराध्यक्ष झाल्या असल्याने त्यांनी पुढाकार घेत या संकुलाच्या दुरावस्थेबाबत ठोस पाऊलं उचलत संकुलाची डागडुजी, स्वच्छता व सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

spot_img
Latest news
Related news