पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस इतिहास, राष्ट्रवादी वर्तमान, आता भविष्य कोण?

महापालिकेच्या राजकीय इतिहासाचा आढावा घेणारा विशेष लेख
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची  1986 साली स्थापना झाली. तेव्हापासून महापालिकेवर सुरूवातीला काँग्रेसचे व नंतर  राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत निर्विवाद बहुमत आहे. 10 वर्षात यंदा प्रथमच राष्ट्रवादीला भाजपने आव्हान दिले आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेचे भविष्य कोणत्या पक्षाच्या हातात जाते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
 
 
पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी म्हणून राज्यभरात ओळख आहे. शहरात राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. देशाच्या कानाकोप-यातील नागरिक शहरात आपली उपजिवीका भागविण्यासाठी स्थायीक झाला आहे. शहराचा विकासही झाला आहे. पिंपरी महापालिकेला देश पातळीवरील ‘बेस्ट सिटी’, ‘स्वच्छ शहर’, पिंपरी महापालिकेच्या सारथी या योजनेला राज्य सरकारच्या गतिमान प्रशासनचा पुरस्कार, ई-गव्हर्नन्स, सुवर्ण पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी 65. 35 टक्के असे विक्रमी मतदान झाले आहे. उद्या (गुरुवारी) निकाल लागणार असून महापालिकेचे भविष्य कोणाच्या हाती असणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा इतिहास जाणून घेऊयात. 

पिपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 ला झाली असली तरी 1986 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची 60 जागांसाठी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी 805 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस (आय) 24, काँग्रेस (एस) 10, भाजप पाच, जनता दल तीन, शिवसेना एक आणि अपक्ष सात असे पक्षीय बलाबल होते. शहराचा प्रथम महापौर होण्याचा मान ज्ञानेश्वर लांडगे यांना तर, उपमहापौर होण्याचा मान हनुमंत भोसले यांना मिळाला होता. 

1992  मध्ये 78 जागांसाठी निवडणूक  झाली. यावेळी काँग्रेस 33, भाजप चार, समाजवादी काँग्रेस दोन, शिवसेना चार, जनता दल, बहुजन समाज पक्ष व आरपीआय यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. यावेळी सर्वांत जास्त म्हणजे तब्बल 32 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. तर, आझम पानसरे बिनविरोध निवडून आले होते.

महापालिकेची 1997 ची निवडणूक 79 जागांसाठी झाली. त्यावेळी 889 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस (आय) 46, शिवसेना नऊ, भाजप आठ, अपक्ष 14, पिंपरी -चिंचवड अभियान दोन असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी प्रभाग 57  मधून उषा गजभार बिनविरोध निवडून आल्या होत्या. 

 2002 मध्ये 35 प्रभागात 105 जागांसाठी महापालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी 718 उमेदवार रिंगणात होते.  राष्ट्रवादी काँग्रेस 36,  काँग्रेस 33, शिवसेना 11, भाजप 13 आणि अपक्ष 12 असे पक्षीय बलाबल होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी करुन सत्ता स्थापन केली होती. 

महापालिकेची 2007 ची निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादीने महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली होती.  यावेळी 105 जागांसाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी 60, काँग्रेस 19, भाजप नऊ, शिवसेना पाच, आरपीआय एक, अपक्ष 11 असे पक्षीय बलाबल होते.

2012 ची निवडणूक 128  जागांसाठी झाली. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादीचे 83, शिवसेना 14, काँग्रेस 14, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार, भारतीय जनता पक्ष तीन, आरपीआय एक आणि अपक्ष नऊ नगरसेवक निवडून आले होते. अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. 

शिवसेना आणि काँग्रेसचे समान संख्याबळ असल्यामुळे दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. पंरतु, अपक्षांच्या सहाकार्याने काँग्रसने पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद उपभोगले. या पंचवार्षिकमध्ये चार पोटनिवडणुका झाल्या. तीन जागांवार राष्ट्रवादी आणि एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाली होते. 

आता 2017 ची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने झाली आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यंदा 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. राष्ट्रवादीचे शहरातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरात भाजपची ताकद वाढली असून गेल्या दहा वर्षापासून महापालिकेत एकहाती सत्ता असणा-या राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. 

यंदा सगळेच पक्ष स्वबळावर लढले आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते हे महत्वाचे आहे. यंदा 65. 35 टक्के असे विक्रमी मतदान  झाले आहे. मतांची वाढती टक्केवारी कोणासाठी डोकेदुखी ठरणार हेही महत्वाचे आहे.

भविष्य माझ्या हाती…मी प्रचंड आशावादी… मी राष्ट्रवादी…  हे राष्ट्रवादीचे प्रचारातील गीत सत्यात उतरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भवितव्य राष्ट्रवादीच्या हाती राहते की भाजपच्या हाती जाते हे उद्या (गुरुवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.