खेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार

आमदार सुरेश गोरे यांचा विश्वास

चाकणला सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार


एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांची विधानसभेतील कामगिरी पाहून  जनतेने तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या विचारांना साथ दिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी खेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविणार, असे आश्वासन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी शुक्रवारी (दि.24) चाकण (ता. खेड) येथे दिले. 

तालुक्यात शिवसेनेने मिळविलेल्या नेत्रदीपक यशानंतर शुक्रवारी चाकण येथे शिवसेनेच्या सर्व विजयी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे,  राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, विजयसिंह शिंदे, गणेश सांडभोर, लक्ष्मण जाधव, गणेश जाधव, संजय घनवट, सुरेश चव्हाण, एल.बी.तनपुरे, धोंडिभाऊ कुडेकर, चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, रुपाली कड व पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, सुनिता सांडभोर, ज्योती अरगडे, सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, वैशाली जाधव, भगवान पोखरकर आदींसह शिवसैनिक विविध गावाचे सरपंच, उपसरपंच मोठ्या संखेने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गोरे पुढे म्हणाले की, खेड तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी तीन जागी तर पंचायत समितीच्या चौदा जागांपैकी सात जागी उमेदवार निवडून आले. तालुक्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. खेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या काळात विकासाच्या केवळ गप्पा झाल्या आणि प्रत्यक्षात भ्रष्टाचार बोकाळला होता. शिक्षक बदल्यांमधील घोटाळे, शासनाच्या सामान्य नागरिकांपर्यंत कधीही न झिरपलेल्या योजना ते अगदी काही जणांच्या या घोटाळ्यांमधून झालेल्या आत्महत्या हे अत्यंत विदारक चित्र बदलण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीला नाकारले असून शिवसेनेला कौल दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.