आपल्या कर्तृत्वाने आपल्या विद्यालयाचे नाव मोठे करावे – अभिनेता विद्युत

एमपीसी न्यूज – जीवनात असे कर्तृत्व गाजवले पाहिजेत की ज्यामुळे तुमच्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल. चिंचवडमधील एएसएमच्या विद्यार्थ्यांनीदेखील एएसएमचे नाव अभिमानाने उंचावण्यासारखे कर्तृत्व गाजवा, असा सल्ला कमांडो फेम अभिनेता विद्युत जांबवाल यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ(एएसएम)च्या वतीने आयोजित केलेल्या "इंसिग्निया" सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन विद्युत जांबवालच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री अदा शर्मा, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे, संचालिका डॉ. प्रीती पाचपांडे, समन्वयक प्रा. दिलीप पवार आदी उपस्थित होते.

 

विद्युत पुढे म्हणाले की, मी ज्या महाविद्यालयात शिकायला होतो त्या महाविद्यालयाचे संजय दत्त देखील माजी विद्यार्थी आहे. दत्त जेव्हा येणार तेव्हा आमच्यामध्ये त्यांना पाहण्याची प्रचंड उत्सुकता असायची. मग ते रात्री भेटी द्यायचे तेव्हा देखील आम्ही मित्र एकत्र यायचो. तेव्हा मी ठरवले होते कि आपल्याला देखील बघायला नागरिकांची गर्दी होईल, असे काम करू. आज माझी तशीच स्थिती झाली. तरुणांवर देशाची मोठी जबाबदारी आहे. यशस्वी होण्यासाठी धाडसी बनले पाहिजेत. धाडसी पाऊल ध्येय साध्य करण्याचे पहिली पायरी आहे. विद्यार्थी दशेत मला व्यासपीठावर जाण्याची भीती वाटायची. न घाबरता व्यासपीठावरील पहिले पाऊल हे यशाकडे नेणारे पहिले पाऊल आहे, अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

नृत्य, अभिनय, क्रीडा स्पर्धांनी भरगच्च अशा या इंसिग्निया महोत्सवात साडेतीनशे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जसबीर कौर हिने तर आभार प्रा.दिलीप पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.