पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून भारतीय अंध क्रिकेट संघ उत्साही

एमपीसी न्यूज – इंडसइंड बँक भारतीय अंध क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी युवक कल्याण व क्रीडा मंत्री विजय गोयल, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत, राज्याचे मंत्री क्रिशन पाल गुर्जर आदी उपस्थित होते.

भारतीय अंध क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसर्‍यांदा भेटून अत्यंत आनंद झाला. याआधी 2014 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय अंध क्रिकेट संघाने भेट घेतली होती. रविवारी मन की बात कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. याप्रसंगी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे 17 क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक यांना प्रत्येकी 2 लाख रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी संघाविषयी आपला अभिमान व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे क्रिकेटपटू फक्त एक खेळाडूच नाहीत, तर याचबरोबर ते सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत.

यावेळी जागतिक अंध क्रिकेट समिती आणि क्रिकेट असोसिएशन फॉर  द ब्लाईंड इन इंडियाचे अध्यक्ष महंतेश जी.के. म्हणाले की, पंतप्रधान यांची भेट घेऊन आमचा उत्साह वाढला आहे. प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यानंतर आमचा उत्साह व्दिगुणित होतो आणि देशासाठी आणखी काहीतरी करण्याची आमची जिद्द वाढते. आम्ही देशाचे नाव आणखी उंचावण्यासाठी आणि अंध क्रिकेट  क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी आणखी प्रयत्न करू. पंतप्रधान यांच्याशी झालेली ही भेट आमच्यासाठी निश्चितच एक अविस्मरणीय क्षण आहे आणि हा क्षण सदैव आमच्या स्मरणात राहील. पंतप्रधान यांच्याबरोबर झालेल्या या बैठकीमुळे भारतीय अंध क्रिकेट संघाच्या मौसमाचा शेवट परिपूर्ण आणि यशस्वी ठरला.

भारतीय अंध क्रिकेट संघाने सलग दुसर्‍यांदा जागतिक विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले असून जगज्जेता म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.