सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

आव्हानात्मक भूमिकेत दिसणार सिया पाटील

एमपीसी न्यूज – आपल्या वाट्याला एखादी आव्हानात्मक भूमिका यावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मात्र, काही जणांची ही इच्छा लवकर पूर्ण होते तर काहींना त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अभिनेत्री सिया पाटीलच्या वाट्यालाही ‘गर्भ’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अशीच एक आव्हानात्मक भूमिका आली आहे. हा चित्रपट येत्या 17 मार्चला प्रदर्शित होत आहे.

‘श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ निर्मिती संस्थेच्या राजेंद्र आटोळे यांनी ‘गर्भ’ या कौटुंबिकपटाची निर्मिती केली आहे तर सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली असून दिग्दर्शन सुभाष घोरपडे यांनी केले आहे.

‘गर्भ’ या स्त्रीप्रधान चित्रपटात सिया कविता ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. आजवर सियाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी ‘गर्भ’मध्ये सियाने कविता या व्यक्तिरेखेतून एका स्त्रिचा संपूर्ण प्रवास रेखाटला आहे. साधी सरळ, मेहनती कविता कॉलेजमध्ये प्रेमात पडते, समंजस असा जोडीदार तिला लाभतो अर्थात पुढे अशा काही घटना घडतात की, कविताला अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. मुलगी, पत्नी, आई, सून अशा विविध नात्यातील बंध आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे.

सिया पाटील सोबत सुशांत शेलार, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर, वंदना वाकनीस, पल्लवी वैद्य आदी कलाकारांच्या यात भूमिका असून आरजे दिलीप ‘गर्भ’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. संवेदनशील विषयाची सुयोग्य मांडणी असणारा ‘गर्भ’ चित्रपट 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

spot_img
Latest news
Related news