पिंपरीत भाजपच्या मतांमध्ये 30 टक्के वाढ तर, राष्ट्रवादीच्या मतांची 11 टक्यांनी घट

शिवसेनेच्या टक्केवारीत वाढ; संख्याबळ मात्र घटले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये यंदा तब्बल 30. 33 टक्यांची वाढ झाली आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये 10.9 टक्क्यांनी घट झाली आहे. शिवसेनेच्या मतांमध्येही 4.76 टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये 8.63 टक्के आणि मनसेच्या 5.22 टक्के मतांमध्ये घट झाली आहे.  

पक्ष

2012 मतदानाची टक्केवारी

2017 मतदानाची टक्केवारी

2012 2017 च्या मतदानातील वाढ घसरण

राष्ट्रवादी

39.46%

28.56%

(-) 10.9%

भाजप

6.73%

37.06%

(+)30.33%

काँग्रेस

11.75%

3.12%

(-) 08.63%

शिवसेना

11.85%

16.61%

(+)4.76%

मनसे

6.60%

1.38%

(-)5.22%

2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 39.46 टक्के मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे 83 नगरसेवक निवडून आले होते.  2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये तब्बल 10.9 टक्यांनी घट झाली असून राष्ट्रवादीच्या सुफडा साफ झाला आहे. राष्ट्रवादीला यावेळी 28. 56 टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे 36 नगरसेवक निवडून आले आहेत. 2012 मध्ये 6.73 टक्के मते मिळवून 3 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या मतांमध्ये तब्बल  30. 33 टक्यांनी वाढ झाली आहे. भाजपने सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी महापालिका ताब्यात घेतली आहे.

 

भाजप आणि शिवसेना 2012 मध्ये युती करून महापालिका निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेनेने 11.85 टक्के मते मिळवत 14 नगरसेवक निवडून आणले होते. यावेळी स्वबळावर लढलेल्या शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल 4.76 टक्यांनी वाढ झाली असून 16.61 मते मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेचे संख्याबळ घटले असून 14 वरून 9 वर आले आहे.  

 

काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल 8.63 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये काँग्रेसला 11.75 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला केवळ 3.12 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेच्या मतांच्या टक्केवारीमध्येही 5.22 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये मनसेला 6.60 टक्के मते मिळाली होती. मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मनसेला 1.38 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकच नगरसेवक निवडून आला आहे. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच नोटाचा वापर करण्यात आला होता. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते ‘नोटा’ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.

 

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या मतांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. भाजप सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्तारुढ झाला आहे. तर, पिंपरी महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या मतांमध्ये चांगलीच घट झाली आहे. गेल्यावेळी दुस-या क्रमांकावर असलेली शिवसेना यावेळी तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे. स्वबळावर लढणा-या शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, मात्र संख्याबळ घटले आहे. काँग्रेसचा तर महापालिकेत एकही प्रतिनिधी नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.