…अन् बालगंधर्व रंगमंदिराचे प्रवेशद्वार तुटले!

एमपीसी न्यूज – पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे… शिक्षणाचे अमृत घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी पुण्यात येतात… लोकसेवा आणि राज्यसेवेच्या परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुण्यात बहुसंख्य आहेत… या परिक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी  विद्यार्थ्यांची धडपड सुरु असते… बालगंधर्व रंगमंदिरात आज (गुरुवारी) स्पर्धा परिक्षेबाबत आयोजित व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी केली होती… आणि चक्क विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे रंगमंदिराचे प्रवेशद्वार तुटले…

 
ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे यांचे बालगंधर्व रंगमंदिरात स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानासाठी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगमंदिरात एक हजार विद्यार्थी बसण्याची आसन क्षमता आहे. मात्र, तीन हजारहून अधिक विद्यार्थी व्याख्यानासाठी आले होते. त्यामुळे गोंधळ उडाला.

एक हजार विद्यार्थ्यांनी सभागृहात प्रवेश केला. विद्यार्थ्यांची व्याख्यानासाठी सभागृहात प्रवेश करण्याची धडपड सुरू होती. आतमध्ये गर्दी झाल्यानंतर  सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच अडविले. त्यावेळी पाठीमागून अचानक आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यामुळे प्रवेशद्वाराचे गज वाकडे झाले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केले.

डेक्कन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल देवकर म्हणाले की, विद्यार्थी जास्त असल्यामुळे गोंधळ झाला होता. विद्यार्थ्यांची व्याख्यानासाठी सभागृहात प्रवेश करण्याची धडपड सुरु होती. मात्र, सभागृहाची आसन क्षमता एक हजारच आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारासमोर थांबावे लागले होते.  विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे बालगंधर्व रंगमंदिराचे प्रवेशद्वाराचे गज वाकडे झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.