राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व गटनेतेपदी कोणाला मिळणार संधी ?

शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या बैठक

 

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत मागील 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती. मात्र यंदाच्या महापालिकेत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले असून आता राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षप तसेच गटनेत्या पदाचा वंदना चव्हाण यांनी निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्यामुळे आता या दोन्ही पदासाठी उद्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार देखील असणार आहेत.

 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे मोदी लाट दिसून आली आहे. यंदाच्या महापालिकेच्या 162 जागांपैकी 98 जागी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस 40, काँग्रेस 11, शिवसेना 10, मनसे 2 आणि एमआयएम 1 जागा मिळवत खाते उघडले आहे. आता यानंतर प्रत्येक पक्षाच्या वतीने गटनेता निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामध्ये शिवसेनेने नगरसेवक संजय भोसले यांची दोन दिवसापूर्वीच निवड केली असून राष्ट्रवादीने देखील गटनेता आणि शहराध्यक्ष पदाच्या निवडीला गती दिली आहे.

 

या गटनेतापदासाठी नगरसेवक चेतन तुपे, विशाल तांबे, प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे आणि दीपक मानकर हे इच्छुक असून शहर अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक सभागृह नेता सुभाष जगताप, नगरसेवक दीपक मानकर, दिलीप बहाटे आणि आप्पा रेणुसे हे इछुक आहेत. या पदासाठी शरद पवार कोणाची निवड करतात. याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तर शहराध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, शरद पवार ही संधी कोणाला देणार हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

 

अजित पवार काय बोलणार

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर अजित पवार हे टीका करणारे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर नॉट रिचेबेल झाले. त्यांनी या निवडणुकीवर कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. यामुळे पुण्यात काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.