बैलगाडा शर्यती संदर्भात अध्यादेश काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा 

एमपीसी न्यूज – तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विधेयक मंजूर करून अध्यादेश काढण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आज (सोमवार) पासून सुरू झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गाडामालक बैलगाडा घेऊन  विधिमंडळ अधिवेशनात बैलगाडातून धडक देणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्ताव त्यांना विधानभवन परिसरात बैलगाडा नेता आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालय परिसरात आमदार लांडगे यांची भेट घेऊन बैलगाडा शर्यत संदर्भात न्यायालयीन मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने जलीकट्टू स्पर्धेला सकारात्मक निर्णय घेतला. त्याच धर्तीवर आम्ही राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण, बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

बैलगाडा शर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. मात्र, देशातील प्राणीप्रेमी संस्था – संघटनांनी बैलगाडा शर्यतीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायालयीन सल्ला घेऊन विधेयक मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रातील एक संस्कृती आहे. शर्यतीसाठी शेतकरी बैलांना विशेष प्रशिक्षण देतात. शेतीच्या कामाला शर्यतीचे बैल उपयोगात येत आहेत. शर्यतीचे बैल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जोखमीचे असते. बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे अनेक शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी. अशी राज्यातील शेतक-यांची अपेक्षा आहे.

दरम्यान,  सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही वाहने विधानभवन परिसरात कायद्याने नेता येत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी बैलगाडा विधानभवन परिसरात आणण्यास मनाई केली. ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजल्यावर ते स्वतः व पालकमंत्री गिरीश बापट विधानभवनातून भाजप कार्यालयासमोर आले. तेथे थांबलेल्या बैलगाडा जोडीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. आमदार महेश लांडगे तसेच बैलगाडा संघटनेचे निवेदन स्वीकारले.

यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांच्यासह राज्यातील बैलगाडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.