शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पुण्यात येत्या गुरुवारी भारतातील विविध खेळण्यांचे भव्य प्रदर्शन

एमसी न्यूज – टॉय ट्रेड असोसिएशनतर्फे पुण्यामध्ये टॉय एक्सपो या खेळण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जवळील पी.वाय.सी. हिंदु जिमखाना येथे येत्या गुरुवारी, (दि. 9) सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण यांनी दिली.

मनोरंजनात्मक खेळण्यांपासून ते शैक्षणिक खेळण्यांपर्यंत शेकडो प्रकारच्या खेळण्यांचे उत्पादन भारतात विविध ठिकाणी होते. मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय बनावटीच्या खेळण्यांना प्राधान्य देत ती खेळणी सामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे उद्घाटन ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, उपाध्यक्ष बसंत जैन, सचिव राजेंद्र कवाड, खजिनदार जयसिंह सुभेदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचे यंदा 3 रे वर्ष आहे.

यावेळी उपाध्यक्ष बसंत जैन म्हणाले की, प्रदर्शनात विविध प्रकारच्या बाहुल्या, बिल्डिंग ब्लॉक, पझल, इलेक्ट्रॉनिक आणि कलात्मक खेळण्यांचा समावेश असणार आहे. देशभरातून दिल्ली, जयानगर, जालंधरसारख्या शहरांसह गोरेगाव, कांदिवली, जुहू, मालाड, मोहीम येथील खेळणी उत्पादक व विक्रेते यांचे 35 स्टॉल असणार आहेत. प्रदर्शनातील खेळणी विक्रीकरिता उपलब्ध नसून सामान्यांपर्यंत भारतीय खेळण्यांची माहिती पोहोचावी आणि उत्पादक व विक्रेते यांच्यातील सुसंवाद वाढावा, हा या मागचा उद्देश आहे.

spot_img
Latest news
Related news