पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात महिला दिनानिमित्त ‘स्पेशल महिला बसेस’

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी खास स्पेशल महिला बसेस सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून पीएमपीएमएलला खास महिलांसाठी ‘तेजस्वीनी बसेस’ देण्यात येणार आहेत. त्याचीच रंगीत तालीम घेण्यासाठी फक्त महिलांसाठी या बसेस सोडण्यात येणार आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी महिलांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यासाठी खास महिला प्रवाशांच्या सोईसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस सकाळी 9 वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 10 मिनिटापर्यंत कात्रज, कोथरूड, शिवाजीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, वारजेमाळवाडी, मनपा, भेकराईनगर, निगडी या भागातून असतील.

तेजस्विनी बसेस करिता 300 बसची खरेदी

‘तेजस्विनी’ योजनेकरिता स्वतंत्रपणे बस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सन-2016-17 या आर्थिक वर्षात 50 कोटींची तरतूद केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या दोन्ही शहरातदेखील खास महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुणे-पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या महापालिकांकरिता एकूण 300 बस खरेदीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

तेजस्विनीमध्ये असणार महिला चालक, वाहक सीसीटीव्ही

सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांना सुरक्षित प्रवासाकरिता सुरू केल्या जाणाऱ्या बसमध्ये महिला चालक हे दोन्ही कर्मचारी महिलाच असल्या पाहिजेत, असे आदेशात नमूद केले आहे. सध्या पीएमपीएमएल सेवेत महिला वाहक आहेत. मात्र, महिला चालक नाहीत. मात्र, ही बस केवळ महिलांसाठीच असून, सकाळी 7 ते11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या कार्यालये भरणे व सुटण्याच्या वेळेत विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे महिला चालकच असणार आहेत. तसेच या बसमध्ये सीसीटीव्ही, टीव्ही, सार्वजनिक उद्‌घोष करणारी यंत्रणा बसविणे आवश्‍यक आहे. याशिवाय ही बस पर्यावरणपूरक (ग्रीन) असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.