मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून देहूरोड रेल्वे स्थानकात गोंधळ; तीन महिला ताब्यात

एमपीसी न्यूज –  लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून देहूरोड रेल्वे स्थानकात असलेल्या तीन महिलांना प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज (7 मार्च) सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणावळा-पुणे लोकल देहूरोड रेल्वे स्थानकावर येताच तेथे तीन महिला आणि एक पुरूष उभे होते. यातील एका महिलेच्या कडेवर एक बाळ होते तर पुरुषाजवळ असलेल्या एका पिशवीत बाळ असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. हा सर्व प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा केला, तोपर्यंत लोकल सुरू झाली आणि पुढे निघाली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने मोटरमनने लोकल थांबविली आणि त्या तीन महिलांना ताब्यात घेतले. या सर्व गोंधळाचा फायदा घेत त्यांच्यासोबत असलेला पुरुष पिशवीतील बाळासह पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

या सर्व गोंधळानंतर त्या तीन महिलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. या परिसरात यापूर्वीच लहान मुले पळवून नेणारी टोळी वावरत असल्याच्या वावड्या उठत आहे. त्यामुळे या प्रकारानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली असून या सर्व घटनांचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.