कबड्डीपटू ते नगरसेवक कुंदन गायकवाड

एमपीसी न्यूज – लहानपणापासून कबड्डी खेळण्याचा छंद होता. कबड्डी खेळण्याचा छंद जोपासात  वडिलांना व्यावसायात मदत आणि गोरगरिब नागरिकांचे प्रश्न सोडवित आलो. कबड्डी खेळत असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क वाढला. त्यांनी महापालिकेची उमेदवारी दिली आणि माझ्या समाजकार्यामुळे निवडून आल्याचे, भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी ”एमपीसी न्यूज”शी बोलताना सांगितले.  

प्रभाग क्रमांक 1 मधून कुंदन गायकवाड भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. बांधकाम, जमीन-खरेदी विक्रीचा ते व्यवसाय करत आहेत. गायकवाड कुटुंबीय मूळचे विदर्भातील आहे. कुंदन यांचे आजोळ चिखलीगाव आहे. दिवंगत शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत कुंदन यांचे वडील अंबादास गायकवाड काँग्रेसमध्ये कार्यरत होते. प्रा. मोरे यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडून व्यवसाय सुरु केला. कुंदन यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.  

लहानपणापासून कबड्डी खेळण्याचा छंद होता. कबड्डीच्या विविध प्रश्नासंदर्भात आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क वाढला. काही अडी-अडचणी असल्यास आमदार लांडगे यांच्याकडे जायचो. त्यांनी वेळोवेळी मदत केली. त्यातूनच समाजकारणाची प्रेरणा मिळाली. वडिलांना व्यवसायात मदत करत गोरगरिब नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत केली. समाजोपयोगी उपक्रम घेतले. 

समाजकारण करत असताना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. भाजपची उमेदवारी दिली. प्रभागातील नागरिकांनी विश्वास दाखवून मोठ्या मतांच्या फरकाने निवडून दिले आहे. मी जो काही नगरसेवकपदापर्यंत पोहचलो आहे, तो केवळ आमदार महेश लांडगे यांच्यामुळे आहे, असे कुंदन गायकवाड यांनी सांगितले. 
 

प्रभागात महापालिकेचे प्रशस्त रुग्णालय नाही. उद्यान आहे, पण त्यामध्ये लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य नाही. प्रभागातील आरक्षणे ताब्यात घेऊन विकसीत करणार आहे. लग्न, वाढदिवस साजरे करण्यासाठी प्रभागात एक प्रशस्त सभागृह, पोलीस स्टेशन मंजूर झाले असून त्याचे काम सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

महिलांना घरीच रोजगार उपलब्ध आणि महापालिकेच्या योजना महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, कुंदन गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.