शिक्षक पतीने शिक्षक पत्नीचा चाकूने वार करुन केला खून

वानवाडी येथील घटना

एमपीसी न्यूज – शिक्षक पतीने शिक्षक असलेल्या पत्नीचा चाकूने वार करुन निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या हातात सुरा देऊन शिक्षक पती पसार झाला होता. वानवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हा धक्कादायक प्रकार वानवडी येथे उघडकीस आली.

स्नेहा सुनील कदम (वय 35, रा. मनुचंद्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, आझादनगर, वानवडी) असे खून झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सुनील दत्तात्रेय कदम (40, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे, मूळगाव रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्नेहाचे वडील बाबासाहेब केसू चव्हाण (59, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्नेहा महापालिकेच्या राज्य राखीव दल येथील महापालिका शाळा क्रमांक 88 मध्ये शिक्षिका होती. तर सुनील कदम हा सांडस येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. दोघांना मुलगा व मुलगी आहे. स्नेहाचे वडील पोलीस दलातून वरिष्ठ अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.

स्नेहा व सुनील यांचा 2000 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्यात घरगुती कारणावरुन भांडणे होत होती. त्यामुळे दोघेही एका वर्षापासून विभक्त राहत होते. यापूर्वी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सुनीलवर स्नेहाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. 

आठ दिवसांपासून तो पुन्हा स्नेहाला भेटण्यासाठी येत असे. शनिवारी (दि.11) स्नेहा आणि मुलांना घेऊन तो फिरण्यास गेला होता. रात्री आठ वाजता त्यांना घरी सोडून तो बाहेर पडला. मध्यरात्री एकच्या सुमारास सुनील मद्यप्राशन करून पुन्हा स्नेहाच्या घरी आला. जोरजोरात दार ठोठावून त्याने दार उघडण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, स्नेहा झोपलेली असल्याने मुलाने दार उघडले. त्यानंतर सुनील याने स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतले. दरम्यान, मुलगा झोपून गेला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.

तुम्ही मद्यप्राशन करून आलात, बाहेर गाडीतच झोपा, असे स्नेहाने पतीला सांगितले. तिने पतीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्तीने दार ढकलून तो घरात शिरला व खिशातील चाकूने दोनवेळा स्नेहाच्या छातीत गंभीर वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

या हल्ल्यात गंभीर जखमी स्नेहाने ओरडून मदतीसाठी याचना केली. पती सुनील याने वार केलेला चाकू स्वतःच्या खिशात ठेवला आणि स्वयंपाक घरातील चाकू स्नेहाच्या हातात ठेवला. तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलांनी शेजा-यांना घटनेची माहिती दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.

पसार झालेल्या पतीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.