अनाथ मुलांनीही चाखला होळीच्या पुरणपोळीचा गोडवा

 अंधश्रद्धा निर्मूलन समिती व वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

अविनाश दुधवडे 

एमपीसी न्यूज – चाकण मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती व वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने अनाथ मुलांबरोबर होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 

चाकण मधील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसुंधरा बहुउद्देशिय संस्था, कलाविष्कार मंच चाकणच्या यांच्या वतीने खेड तालुक्यातील  ठाकुरपिंपरी व शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रमात व राजगुरुनगर  मधील आदिवासी निवासी शाळा तसेच कातकर वस्तीतील मुलांना पुरणपोळी व शालेय साहित्याचे वाटप करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांच्या समवेत होळीचा सण साजरा केला.

आज या विज्ञान युगात अजूनही मोठ्या प्रमाणात झाडे तोडून  पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान व प्रदूषण केले जाते तसेच पुरणपोळी होळी मध्ये टाकून अन्नाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जाते. जर तिच पोळी एखाद्या भुकेलेल्याला मिळाली तर तो त्या अन्नाने तृप्त होतो. म्हणून या संस्था  समाजातील  अंधश्रद्धा दुर करून समाजप्रबोधनाचे काम करत आहेत . अग्नीत टाकणा-या सुमारे 1500  पुरणपोळी चाकण परिसरातून गोळा करून अनाथाश्रमात वाटण्यात आल्या.

या उपक्रमाचे यंदाचे आठवे  वे वर्ष असून चाकणकर या उपक्रमास उत्स्फूर्तपणे साथ देत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहर (बाप्पू ) शेवकरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.