स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी दिलेल्या संधीचे सोने करू – मुक्ता टिळक

वात्सल्य आणि प्रेरणा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – लोकमान्य टिळकांनी समाजासाठी काम करताना समाजातील प्रत्येक घटकाला पुढे आणले. त्यांचा हा सामाजिक कार्याचा वसा समर्थपणे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकमान्य टिळकांनी 1907 साली बुद्धीभेद विसरून स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आवाहन केले. आम्हाला देखील पुणेकरांनी पुण्याचे सुराज्य करण्याची संधी दिली आहे, या संधीचे आम्ही सोने करू, असा विश्वास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी येथे व्यक्त केला.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, पुणे केंद्र, महिला आघाडीच्या वतीने देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणा-या वैशाली भट यांना आणि वात्सल्य पुरस्कार अनुराधा करकरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे, माधुरी सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोखले, केंद्रप्रमुख प्रकाश दाते, संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता मवाळ, संस्थेच्या महिला आघाडी प्रमुख सरिता काळे, शैला गिजरे, अपर्णा मोडक, यशश्री पुणेकर, सुवर्णा रिसबुड, अनघा जोशी उपस्थित होत्या. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा 7 वे वर्ष आहे. 


   
मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुण्याची वाढ अतिशय अस्तावस्त्य झाली आहे. त्यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. सुजाण नागरिकांची साथ मिळाल्यास अनेक आव्हाने सहजपणे पेलता येतील. निवडणुकीच्या काळातील जाहिरनाम्याप्रमाणे लोकांना बरोबर घेऊन काम करु आणि या प्रक्रियेत तरुणांनी विशेष योगदान देऊन त्यांच्या संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.

ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा आम्हाला मिळाला आहे. त्या संस्काराप्रमाणे आजपर्यंत समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच पारदर्शक कारभार आम्ही यापुढेही करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. सरिता काळे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.