पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईमध्ये ज्येष्ठ नागरिक जखमी


एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आज (बुधवारी) करण्यात येत असलेल्या कारवाईमध्ये 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी महापालिका अधिका-यांना दोष दिला. मात्र, महापालिका प्रशासनाने आम्ही ताताडीने महापालिकेच्याच गाडीतून जखमीला रुग्णालयात हलवल्याचे सांगितले.

प्रकाश नामदेव जाधव (वय 60, रा. रावेत सर्वे क्रमाक 203), असे जखमी ज्येष्ठ नागरिकांचे नाव आहे. 

आज सकाळी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातर्फे कारवाई करण्यात येत होती. यावेळी जाधव यांच्याही घराचे नवे बांधकाम हे अनधिकृत होते. ते पाडल्यानंतर अधिका-यांनी जेसीबी जुन्या बांधकामाकडे वळवला. यावेळी जाधव त्यांच्या पत्नी अधिका-यांनी जुने बांधकाम का पाडता अशी विचारणा करण्यासाठी आले होते. दरम्यान, अचानक जेसीबीने भिंत पाडल्याने ती भिंत जाधव यांच्या अंगावर पडली व त्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना वायसीएममध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या पायाच्या काही नस या दबल्यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर वायसीएममध्ये नसल्याने त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महापालिका अधिका-यांनी मदत न करता सरळ तेथून पळ काढला, असा आरोप केला.

याविषयी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारावाई करण्यात आली ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता केशवराज फुटाणे म्हणाले की, कारवाई नियमाप्रमाणे चालू होती. त्यामध्ये नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी प्रचंड विरोध केला. तेथे तणाव निर्माण केला. यामध्येच एका 4 फूट उंच पत्राशेडची भींत पाडत असताना जाधव अचानक समोर आले. त्यामध्ये ते जखमी झाले. मात्र, आम्ही तेथून पळ काढला नाही तर त्यांना तातडीने महापालिकेच्याच गाडीत टाकून वायसीएमला दाखल करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.