Maval : बारणे यांना मित्र पक्षासह मतदार स्वीकारायला तयार नाहीत – माऊली दाभाडे

एमपीसी न्यूज – बारणे यांना मतदार कोणीही स्वीकारायला तयार नाही. प्रत्येक (Maval) व्यक्तीच्या मनात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. आता कितीही कोणी आव आणला तरी बारणे यांच्यावरील निष्क्रिय हा कलंक पुसला जाणार नाही. कारण तो सलग दहा वर्ष लागला आहे. मित्र पक्ष देखील त्यांना स्वीकारायला तयार नाही. मात्र केंद्रातील भूत मानेवर असल्यामुळे प्रचार करावा लागतोय, अशी मित्र पक्षांची परिस्थिती असल्याचे सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी म्हटले आहे. लोणावळा येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला, यावेळी दाभाडे बोलत होते.

या मेळाव्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, गुरव समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, लोणावळा शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगरसेवक सुनील इंगुळकर, युवक नेते फिरोज बागवान, तळेगाव शहर अध्यक्ष नंदकुमार कोतूळकर, ज्येष्ठ नेते दादा भोंगाडे, अल्पसंख्यक अध्यक्ष जकिर शेख, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी व सुधीर शिर्के, शुभम जोशी, सेवादलाचे अध्यक्ष सुनील मोगरे, लक्ष्मण दाभाडे, माजी युवक अध्यक्ष दत्ता दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीमधील राष्ट्रवादीने खासदारांनी मावळ मतदार संघात विकासाचे काय दिवे लावले ते सांगा अशी विचारणा काही दिवसांपूर्वी उघडपणे केली होती तर भाजपाने बारणे नावाचा निष्क्रिय उमेदवार बदला, आम्ही काम करणार नाही अशी थेट भूमिका मांडली होती. तरी देखील युतीच्या डोक्यावर मिऱ्या वाटत पुन्हा निष्क्रियतेचा ठपका असलेल्या बारणे यांना मावळात उमेदवारी शिंदे यांनी दिली आहे असा जोरदार हल्लाबोल सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी आज लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे.

 

Talegaon Dabhade : अक्षय तृतीयानिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात रुद्र याग, चंदन उटी व भंडारा

दाभाडे म्हणाले, भारत देश हा लोकशाही देश आहे.येथे प्रत्येकाला चांगलं वाईट निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मागील दहा वर्ष मावळ लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी बारणे यांना दिली. आम्ही सुध्दा त्यांचा प्रचार केला होता. मात्र त्यांनी दहा वर्षात एकाही कामाची चुणूक दाखवली नाही. असा नामधारी खासदार काय कामाचा आहे. त्या विरुध्द महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका झाली. त्यांचे वडील यांनी त्या भागात औद्योगिक क्रांती घडवली अशी खानदानी परंपरा असलेला उमेदवार असल्याने यावेळी मतदारांनी भावनेवर आधारित नाहीत तर मेरिट वर आधारित व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारा उमेदवार लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला असल्याने मावळातून किमान 50 हजार मतांचे मताधिक्य संजोग वाघेरे यांना मिळवून देऊ असा विश्वास दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

माऊली दाभाडे म्हणाले, मोदींची दहा वर्षाची कारकिर्दी लोकांनी पाहिली (Maval) आहे. 2014 साली गुजरात मॉडेल सांगत डमरू वाजवले लोकांनी त्यांना संधी दिली. सत्तेवर येताच नोटबंदी केली त्यामध्ये शेकडो लोकं रांगेत उभे राहून मयत झाले. काळा पैसे आणतो म्हणाले तो आणला नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकतो म्हटले ते टाकले नाही. 64 रुपये पेट्रोल व 400 रुपये गॅस होता तेव्हा स्मृती इराणी डोक्यावर सिलेंडर घेऊन महागाईच्या विरोधात ओरडत होत्या आता सिलेंडर 1100 रुपये झाला व पेट्रोल 105 रुपये झाले आहे. महागाई कमी करण्यात मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. 2019 साली हे राष्ट्र भक्तीचा ठेका घेतलेले ठेकेदार यांनी पुलवामा हल्ल्याचा फायदा घेत निवडणूक जिंकली. आता 2024 ला हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला आहे.

आत्मनिर्भर भारत,स्टार्टअप सुरू केले. मुळात (Maval) भाजपा आत्मनिर्भर झाली का? व झाली असेल तर तुम्हाला शिवसेना व राष्ट्रवादीची मदत का घ्यावी लागली. भाजपाने बाळासाहेबांची शिवसेना फोडली, शासकीय यंत्रणेच्या वापर करत विरोधकांची मुस्कट दाबी केली. मोगलांचे आक्रमण झाल्यानंतर येथील सरदार, जहागीरदार, इनामदार यांनी मुस्लिम धर्म स्विकारला तसेच आता इडी, सीबीआयची भीती दाखवत पक्षांतर सुरू आहे. या देशावर हिंदू प्रमाणे मुस्लिमांचा देखील हक्क आहे. सत्तेच्या जोरावर सत्तांतर सुरू आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना भाजपात घेतले गेले हे महाराष्ट्राला पटलेले नाही. त्यामुळे सर्वत्र भाजपाच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे.

मावळात पर्यटन व्यवसायाला चालना द्यायची होती मात्र बारणे यांच्याकडे प्रकल्प अहवाल तयार करून दिल्यानंतर देखील त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. पर्यटन व्यवसायाला 4 टक्के दराने कर्ज पुरवठा होता. याकरिता केंद्राची जी जोड लागते ती बारणे यांनी दिली नाही. येथील पर्यटन विकासाला ब्रेक लावायचे काम बारणे यांनी केले.

आमदार सुनील शेळके या गोष्टीचे साक्षीदार आहेत. मावळ तालुक्यात विवाहितेवर पर्यटन विकास झाला असता तर आज मावळातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला असता मात्र जाणीवपूर्वक या कामांना खो घालण्याचे काम बारणे यांनी केले आहे. आता हा पर्यटनात्मक विकास आपल्याला संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून साधायला हवा असल्याचे सांगितले. दाभाडे म्हणाले, वाघेरे हे स्वच्छ प्रतिमा असलेले व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेले, लोकांमध्ये राहणारे खानदानी उमेदवार असल्याने आज संपूर्ण मावळ तालुका पक्ष बाजूला सारत त्यांच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने गुणवत्तेवर आधारित व विकासाची दृष्टी व काम करण्याची धमक असलेल्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन त्यांनी केले (Maval) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.