Jaggery Rate : ऐन दिवाळीत गुळाच्या क्विंटलच्या दरात 300 ते 400 रूपयांनी वाढ

एमपीसी न्यूज : ऐन दिवाळीत गुळाचा वापर करून अनेक फराळाचे पदार्थ तयार केले जातात. पण, यंदा मागणीच्या तुलनेत आवक अत्यल्प होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुळाच्या क्विंटलच्या दरात 300 ते 400 रूपयांनी वाढ झाली आहे. 
जिल्ह्यात शिरूर, दौंड व इंदापूर तालुक्यात गुर्‍हाळांची संख्या अधिक आहे. याच भागातून गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, सद्य:स्थितीत या भागात मोजकीच गुर्‍हाळे सुरू आहेत. त्यामुळे आवक घटली आहे. परिणामी घाऊक आणि किरकोळ बाजारात गुळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत आवक वाढणार नसल्याने दर कायम राहणार असल्याचे  व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील भुसार विभागात दौंड, केडगाव, पाटस, लोणी काळभोर, शिरूर या भागातून गुळाची आवक होत आहे. सद्य:स्थितीत गुळाच्या बॉक्सला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. दौंड आणि इंदापूर भागातील बॉक्सची क्विंटलची किंमत 3700 ते 4300 इतकी आहे. तर पाटण, कराड, सांगली आणि कोल्हापूर भागातील गुळाच्या बॉक्सचा क्विंटलचा दर 4500 ते 5100 इतका आहे. दिवाळी सणामुळे बाजारात दिवसेंदिवस ग्राहकांकडून गुळाला मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत खुपच कमी आवक होत आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. दिवाळीपर्यंत गुळाची आवक न वाढल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही जवाहरलाल बोथरा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.