Pune News : जिल्ह्यात वीजबिल थकबाकी 3,109 कोटी, भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित होणार

एमपीसी न्यूज – जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा व इतर सर्व वर्गवारीतील 9 लाख 43 हजार 564 ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी सद्यस्थितीत 3,109 कोटींवर गेली आहे. या थकबाकीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून पुणे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे 80 ते 85 टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘कोरोना’ची तिसरी लाट ओसरल्यामुळे जनजीवन सुरळीत आहे. सोबतच वाढत्या उन्हामुळे सर्वच वर्गवारीमध्ये वाढत्या वापराने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे.

दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसूलीला वेग देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये घरगुती 6 लाख 30 हजार 581 ग्राहकांकडे 137 कोटी 27 लाख, वाणिज्यिक 88 हजार 66 ग्राहकांकडे 43 कोटी 50 लाख, औद्योगिक 11 हजार 582 ग्राहकांकडे 18 कोटी 56 लाख रुपये तसेच कृषी 3 लाख 12 हजार 983 ग्राहकांकडे 2324 कोटी 35 लाख आणि पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे 568 कोटी 19 लाख व सार्वजनिक सेवा वर्गवारीसह सर्व ग्राहकांकडे एकूण 3109 कोटी 9 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी ग्राहकांनी दि. 31 मार्च 2022 पर्यंत 2324 कोटी 35 लाखांपैकी 50 टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना उर्वरित थकबाकी माफ करण्यात येत आहे.

घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.