Maharashtra News : महाराष्ट्रावर भारनियमाची टांगती तलवार? दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढू लागला आहे, त्यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे काहीसे चित्र असताना भारनियमनाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच गरजेप्रमाणे कोळसा उपलब्ध होत नसल्याने राज्यात भारनियमन सुरू होण्याची शक्यता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यात पुन्हा एकदा कोळशाचा तुटवडा जाणवू लागला आहे, त्यामुळे भारनियमाचे संकट राज्यात घिरट्या घालू लागले आहे. दरम्यान केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा राज्यातल्या वीज प्रकल्पांत शिल्लक आहे. राज्यात कोळशातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असल्याने पुढच्या एक-दोन दिवसांत कोळसा उपलब्ध झाला नाही तर भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यात कोराडी वीज प्रकल्प, नाशिक वीज प्रकल्प, भुसावळ वीज प्रकल्प, परळी वीज प्रकल्प, पारस वीज प्रकल्प, चंद्रपूर वीज प्रकल्प, खापरखेडा वीज प्रकल्प असे सात वीज प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये सध्या 6 लाख 75 हजार मेट्रिक टन इतकात कोळसा शिल्लक आहे.

कोळसा वेळीच उपलब्ध झाला नाही तर राज्य अंधारात जाणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे या संकटाला विचारात घेऊन आपल्या घरातील विजेचा वापर जपून करावा लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.