Bopkhel : बोपखेल पुलासाठी 53 कोटींचा खर्च; स्थायी समितीची मान्यता 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पूल बांधण्यात येणार आहे. टी.एन्ड. टी.इन्फ्रा या कंत्राटदाराकडून 53 कोटी 53 लाख 37 हजार रुपयांमध्ये रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेसह आणि प्रत्यक्ष येणा-या जीएसटी खर्चापर्यंत पुलाचे काम करुन घेण्यास आणि करारनामा करण्यास आज (गुरुवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला.

बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पूल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर महापालिकेने 15 मार्च 2019 रोजी 45 कोटी 46 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदेची मुदत 29 मार्चपर्यंत होती. तथापि, या मुदतीत एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. त्यानंतर निविदेला मुदतवाढ देण्यात आली. 20 एप्रिल रोजी निविदा उघडण्यात आली. टी.एन्ड. टी.इन्फ्रा या एकाच कंत्राटदाराची निविदा प्राप्त झाली. त्यांनी 52 कोटी 83 लाख रुपये दर दिला. महापालिकेने टी.एन्ड. टी.इन्फ्रा या कंत्राटदाराकडे 3 मे, 15 मे आणि 17 जून 2019 असा तीनवेळा पत्रव्यवहार करुन दर कमी करण्याबाबत विचारणा केली. त्यानुसार कंत्राटदाराने 18 जून रोजी महापालिकेला पत्र पाठवून 52 कोटी 83 लाख रुपये सुधारित दर सादर केला.

राज्य सरकारच्या दरसुचीनुसार टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टील फरक आणि रॉयल्टी चार्जेसह लमसम किंमत 53 कोटी 99 लाख 27 हजार रुपये इतकी येत आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश केला नाही. टी.एन्ड. टी.इन्फ्रा या  कंत्राटदाराने दिलेला सुधारित दर 53 कोटी 53 लाख 37 हजार रुपये इतका असून हा दर निविदा स्वीकृतयोग्य 53 कोटी 99 लाख 27 हजार रुपये याची तुलना करता 0.85 टक्के कमी आहे. टी.एन्ड. टी.इन्फ्रा या  कंत्राटदाराकडून 53 कोटी 53 लाख 37 हजार रुपयांमध्ये रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेसह आणि प्रत्यक्ष येणा-या जीएसटी खर्चापर्यंत काम करुन घेण्यास आणि ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पुलासाठी पाठपुरावा करणारे बोपखेलचे नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पूल बांधण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याला यश आले. बोपखेलवासियांचा पुलाचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. पुलाच्या खर्चाला स्थायी समितीने आज मान्यता दिली. आता तातडीने वर्क ऑर्डर (कार्यरंभ आदेश)देऊन कामाला सुरुवात करावी. काम वेगात करुन वेळेत पूर्ण करावे, अशी बोपखेलवासियांची अपेक्षा आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.