पिंपरी महापालिकेत पाच वर्षात भाजपच्या 65 नगरसेवकांना पदे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तारुढ झालेल्या भाजपच्या 65 नगरसेवकांना पाच वर्षात विविध पदे मिळणार आहेत. एका वर्षामध्ये 13 जणांना पदे मिळणार आहेत. महापौर आणि उपमहापौर सव्वा वर्षासाठी नियुक्त केले जातील. तसे केले तर पाच वर्षात आठ जणांना महापौर आणि उपमहापौर होण्याची संधी मिळू शकते.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता भाजपने उलथवून लावली आहे. भाजपने 77 नगरसेवक जिंकत पिंपरी महापालिका एकहाती ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात भाजपच्या 65 नगरसेवकांना महापालिकेतील विविध पदे उपभोगण्यास मिळणार आहेत.

 

महापालिकेत स्थायी समिती, विधी समिती, जैवविविधता व्यवस्थापन समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती अशा सहा समित्या आहेत. तर, यंदा शिक्षण मंडळ बरखास्त केले आहे. शिक्षण समिती स्थापन केली जाणार असून शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवकांचीच निवड केली जाणार आहे.

 

अ,ब,क,ड, इ आणि फ असे सहा क्षेत्रिय कार्यालये आहेत. या समित्यांचे सभापती आणि क्षेत्रिय कार्यालयाचे अध्यक्ष वर्षाला बदलले जातात. त्यामुळे एका वर्षामध्ये 13 जणांना सभापती किंवा क्षेत्रिय कार्यालयाचे अध्यक्षपद मिळणार आहे. समिती सभापतीला महापालिकेचे वाहन आणि कार्यालय असते. क्षेत्रिय कार्यालयाच्या अध्यक्षालाही महापालिकेचे वाहन असते. त्यामुळे पाच वर्षात भाजपच्या 65 नगरसेवकांना विविध पदे उपभोगता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.