Pune : लोहगाव भागात 7 ते 8 दिवसांनी पाणी; तातडीने प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन : शिवसेनेचा इशारा

एमपीसी न्यूज – लोहगाव भागाला 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळते. हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, विभाग प्रमुख सोमनाथ खांदवे, प्रभाग प्रमुख काळूराम साठे, सोमनाथ खांदवे, संजय मौझे यावेळी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 43 लोहगाव हे दि. 4 ऑक्टोबर 2017 ला पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून लोहगावमधील नागरिक मालमत्ता कर व पाणीपट्टी पुणे महापालिकेला नियमितपणे भरत आहेत. परंतु, आजही अडीच वर्षे होऊनही या भागात पाण्याची समस्या बिकट आहे. प्रत्येक घराला पिण्याचे पाणी 7 ते 8 दिवसांनी मिळत आहे. तर, वापरण्यासाठीचे पाणी नागरिकांना विकतच घ्यावे लागते.

लोहगावमधील पाणीप्रश्न तातडीने सोडवून प्रत्येक घराला किमान दोन दिवसांनी तरी पाणी मिळावे, असे नियोजन करावे, राहिवाशांना पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अन्यथा 8 ते 10 दिवसांत लोहगावमधील नागरिक, शिवसैनिक पुणे महापालिकेच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा, निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.