LokSabha Elections 2024 : मावळमध्ये दोन्ही शिवसेनेतच लढत!

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच ( LokSabha Elections 2024) लढत होणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही शिवसेनेत होणा-या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुर्नरचना झाली. या  पुर्नरचनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करत मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे उमेदवांराची दोन जिल्ह्यात प्रचारासाठी कसरत होणार आहे. दोन जिल्ह्यांचा मतदारसंघ असला तरी, सलग तीनवेळा मतदारसंघावर पुणे जिल्ह्याचे आणि एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. आता शिवसेनेत फुट पडली असून मावळातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. तिन्हीवेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती.

Chinchwad : ”शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा  शुभारंभ,  37 कलावंत 9 गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महायुतीत भाजपसोबत आहेत. त्यामुळे मावळमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिवसेनेपेक्षा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. भाजपचे दोन , एक संलग्न अपक्ष असे तीन तर राष्ट्रवादीचे दोन आमदार असून शिवसेनेचा एकच आमदार आहे. या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांनी मावळवर दावा केला होता. परंतु, महायुतीत मावळ मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे.

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार- उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे मावळ मतदारसंघ राहिला आहे. माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मावळात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बारणे यांच्याकडे तिस-यावेळी धनुष्यबाण चिन्ह असले तरी उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत नाहीत. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर वाघेरे लढत आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेत होणार लढती कडवी होईल असे राजकीय जाणकार सांगतात.

मावळमध्ये शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी, भाजपची ताकद

मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरीत अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप भाजपच्या आमदार असून उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी  भाजपशी संलग्न आहेत. शिवसेनेचा केवळ कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. शिवसेनेपेक्षा भाजप, राष्ट्रवादीची मावळत ताकद जास्त आहे.

स्थानिक उमेदवारांमध्ये लढत

मावळ मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागला असला तरी, यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक आणि दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बारणे हे थेरगावमधील तर वाघेरे पिंपरीगावातील रहिवासी आहेत. दोन्ही स्थानिक उमेदवार असल्याने गावकी-भावकीच्या मतांची विभागणी होणार आहे. याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार( LokSabha Elections 2024) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.