BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंपनीमधून भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून खंडणीची मागणाऱ्या दोघाजणांवर गुन्हा

चाकण एमआयडीसी मधील प्रकार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) हद्दीतील बजाज कंपनीतून लाकडी भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून वीस हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरारी झाला आहे.

जीशान मेहमूद अली (वय २५, सध्या रा. कुदळवाडी, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जीशान अली याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय नामदेव काचळे (रा. महाळुंगे, ता. खेड) व आल्हाट (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जीशान अली हा आयशर टेम्पो (एम एच १४ सी ती ३९४२) घेऊन टेम्पो चालक सेसमंत चौधरी याच्या समवेत शनिवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे हद्दीतील बजाज कंपनीमध्ये आला. सदर कंपनीत लाकडी भंगार माल भरून टेम्पो बजाज कंपनी रोडवरून निघोजे रोडने कुदळवाडी येथे निघाला असता ठाकरवाडीजवळ एक मोटरसायकल चालकाने ( एम एच १४ सी झेड ६३८२) दुचाकी टेम्पोला आडवी घालून टेम्पो थांबवला.

त्यावेळी फिर्यादी अली याने त्यास विचारणा केली असता, येथील कंपन्यांकडून लाकडी भंगार खरेदी करण्याचे ठेके आम्ही घेतो. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पैशांनी लाकडी बॅलेट खरेदी करता. त्यामुळे मला आता वीस हजार रुपये दिले तरच मी तुमचा टेम्पो पुढे जाऊ देईन असे सांगितले. त्यानंतर एका मोटारीतून आलेल्या आल्हाट नामक इसमाने सुद्धा टेम्पोच्या समोर आपली मोटार उभी केली.

त्यानंतर टेम्पोच्या चालकाने पैसे नाहीत. जाऊ द्या, अशी विनवणी केली. मात्र संबंधित इसमांनी दमदाटी सुरु केली. अखेरीस टेम्पो चालक आणि फिर्यादी यांनी टेम्पोचे मालक सौरभ अली यांना सदरच्या घटनेची माहिती दिली. सौरभ अली यांनी चाकण पोलीस ठाण्यात फोन करून सदरचा प्रकार सांगितला.
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अक्षय नामदेव काचोळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी मोटारीतील आल्हाट याने मोटार घेऊन तेथून पोबारा केला.

या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.