Chinchwad : डांगे चौकात ग्रेडसेपरेटर ; तब्बल चार महिन्यांनी स्थायी समोर निविदा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 17 कोटी 96 लाख 94 हजार रुपये खर्च येणार आहे. ग्रेडसेपरेटर झाल्यास चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, तब्बल चार महिन्यानंतर ग्रेडसेपरेटरची निविदा अखेरच्या स्थायी समितीच्या सभेसमोर मान्यतेसाठी आली. त्यामुळे निविदा लांबणीवर टाकण्याचे ‘गूढ’ कायम आहे.

महापालिकेतर्फे थेरगाव, डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाची 24 कोटी 71 लाख रुपयांची निविदा 12 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रियेत टी. अॅन्ड टी इन्फ्रा (16 कोटी 54 लाख), व्ही. एम. मातेरे इन्फ्रा (16 कोटी 75 लाख)आणि कुष्णाई इन्फ्रा प्रा. लि (17 कोटी)यांनी सहभाग घेतला. 5 नोव्हेंबर 2018 रोजी ही निविदा उघडण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी टी. अॅन्ड टी इन्फ्रा यांना कंत्राट दर कमी करण्याची लेखी विचारणा केली. 3 डिसेंबर 2018 रोजी या ठेकेदाराने कंत्राटाचा सुधारित दर सादर केला.

त्यात बांधकाम खर्च 16 कोटी 54 लाख 10 हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस, डिझाईन चार्जेस, रॉयल्टी चार्जेस यासह कंत्राटदाराने 17 कोटी 96 लाख 94 हजार दर निश्चित केला. या खर्चाला मान्यता देण्याचा देण्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयत्यावेळचा प्रस्ताव अखरेच्या म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. त्यास मान्यता देण्यात आली. तथापि, हा विषय चार महिने लांबणीवर का टाकला याबाबतचे ‘गूढ’ कायम आहे.

चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, भोसरी या भागात राहणारे नागरिक आयटीपार्क आणि परिसरात जाण्यासाठी सांगवी किवळे बीआरटीरोड चा वापर करतात. त्यामुळे हा सर्वात जास्त बस वाहतूक होणारा रस्ता आहे. नागरिकांची संख्या जास्त असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चौकांमध्ये सिग्नलची वेळ देखील वाढली आहे. विशेषतः डांगे चौकात सर्वात जास्त त्रास होतो. याबाबत स्थानिक नागरिक डांगे चौकातील अडचणींबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत आहेत.

याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 3 जानेवारी 2017 आणि 1 मार्च 2017 रोजी डांगे चौकात दुसरा उड्डाणपूल बांधण्याबाबत पत्र दिले होते. त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या बीआरटी विभागाने डीएफआर रिपोर्ट तयार केला. संबंधितांनी ट्रॅफिक आणि वाहतुकीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. त्यात डांगे चौकामध्ये दुस-या उड्डाणपुलाऐवजी अंडरग्राउंड ग्रेड सेपरेटर करण्याचे सुचविले होते. त्यानुसार ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे.

ग्रेडसेपरेटरचे फायदे

सध्या 160 सेकंदांचा सिग्नल आहे
ग्रेड सेपरेटर झाल्यास सिग्नल टायमिंग 50 टक्क्यांनी कमी होईल.
नागरिकांना जास्त वेळ वाट पाहत बसावे लागणार नाही
अपघातांचे प्रमाण घटेल
इंधन, वेळेची बचत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.