Pimpri: अधिकाऱ्यांच्या बढत्यांमध्ये विधी समितीला रस

तिघांना कार्यकारी अभियंतापदी तर तिघांना सहाय्यक आयुक्तपदी बढती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विभागीय पद्दोनती समिती कार्यरत असताना सत्ताधारी भाजप नगरसेवकांना अधिकारी, उपअभियंत्यांच्या बढत्यांची चिंता सतावत आहे. विधी समितीच्या आज (शुक्रवारी)झालेल्या पाक्षिक सभेत तीन प्रशासन अधिका-यांना सहाय्यक आयुक्तपदी तर तीन उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढती देण्याचा ठराव समितीने केला आहे. या सदस्यपारित ठरावामुळे बढतीस पात्र अधिका-यांमध्ये ‘खदखद’ वाढली आहे. या ठरावाला महासभेने अंतिम मान्यता दिली. तरी, सदस्य पारित ठराव असल्याने त्याचे भवितव्य आयुक्तांचे हाती असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा आज (शुक्रवारी) पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती माधुरी कुलकर्णी होत्या. विषपत्रिकेवर दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्याचे काम देण्याचे चार प्रस्ताव होते. याशिवाय सदस्यांनी या सभेत सदस्य प्रस्ताव करत प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, राजेश आगळे, सीताराम बहुरे यांना सहाय्यक आयुक्तपदी तर उपअभियंता संध्या वाघ, शिवाजी चौरे, विलास देसले यांना कार्यकारी अभियंतापदी एकमताने बढती दिली.

विधी समितीच्या सदस्यांचा एक वर्षाचा कार्यकाल मे महिन्यात संपुष्टात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची विधी समितीची सभा शेवटची सभा असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या सभेत अधिका-यांना बढत्या देण्याचा सदस्यपारित ठराव करण्यात आला. महासभेत या ठरावावर शिक्कामोर्तब होईल.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विधी समितीच्या सभेत सदस्यपारित ठराव करत अधिका-यांना बढत्या देण्याचे सत्र सुरुच आहे. महापालिका आयुक्तांऐवजी सदस्य बढत्यांचे ठराव करत ‘निवडक’ अधिका-यांना खूष करत आहेत. मात्र, दुसरीकडे पात्र अधिका-यांची खप्पामर्जी ओढवून घेत आहेत. कोणत्या निकषानुसार बढतीचे ठराव पारित होतात. याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.