Bhosari : विधानसभेची जागा भाजपला सोडण्याबाबत आढळराव घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

आढळराव आरोप मागे घेणार ; महेश लांडगे यांनी केला युतीचा प्रचार सुरु

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यात आज(शुक्रवारी)’समेट’ झाला. भोसरी विधानसभेची जागा भाजपला सोडण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवसात भेट घेतली जाणार आहे. त्यासोबतच भोसरीतील विकास कामाबात आजवर केलेले आरोप आणि दिलेली पत्र खासदार आढळराव मागे घेणार आहेत, या अटी-शर्तीवर हा समेट झाला आहे. महेश लांडगे यांनी आजपासून युतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आढळराव यांचा प्रचार करण्यासाठी आणि आजपर्यंत झालेले मदतभेद सोडविण्यासाठी भोसरीत आज (शुक्रवारी) बैठक झाली. बैठकीला शिरुरचे उमेदवार व विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, बाळासाहेब गव्हाणे, सारंग कामतेकर, विजय फुगे, संजय गायकवाड, महादेव गव्हाणे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

शिवसेना-भाजपच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार शरद सोनवणे आणि महेश लांडगे असणार आहेत.

त्याचबरोबर खासदार आढळराव यांनी गेल्या साडेचार वर्षात भोसरीतील विविध विकासकामांबाबत केलेले आरोप आणि दिलेली पत्रे मागे घेतली जाणार आहेत. आढळराव यांनी रस्ते विकास, वेस्ट टू इनर्जीबाबत आरोप केले होते. हे सर्व आरोप आणि याबाबतची पत्रे मागे घेतली जाणार आहेत, असे बैठकीतील सूत्रांनी सांगितले.

चार वर्षात झालेले आरोप-प्रत्यारोप अनावधानाने झाले आहेत. त्यामुळे झाले ते झाले. यापुढे असे होणार नाही. मागे झाले ते पुढे होऊ देऊ नका. यापुढे त्याची दक्षता घेण्याचे बैठकीत ठरले आहे. आजपासून महेश लांडगे यांनी प्रचार सुरु केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.