Pimpri: मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी पूर्ण; वाहने पार्किंगची चोख व्यवस्था –लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर उद्या (शनिवारी) होणा-या सभेची पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघातील एक लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्राधिकरणातील काही रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असून, तीन ठिकाणी मोठ्या जागेत वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मदनलाल धिंग्रा मैदानावर दुपारी तीन वाजता सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटणार असून, भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याचा विशेष आनंद आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या या सभेला एक लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.

सभेला एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्यामुळे वाहतूक आणि पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. निगडी प्राधिकरणातील काही रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारी दुपारी तीननंतर निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते बीआरटी रस्ता तसेच काचघर चौक ते भेळ चौक दरम्यानच्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे मैदान व मूकबधीर शाळेच्या मैदानावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) वाहनांसाठी पार्किंग सुविधा असेल. बीआरटी रोड व भक्ती-शक्ती दरम्यान बस व कार पार्किंगची व्यवस्था असेल. तसेच अन्य वाहनांची दुर्गादेवी टेकडीच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.