Pune : राजकारणात 80 टक्के समाजकारण केले पाहिजे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एमपीसी न्यूज -भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये संकल्प 5 हजार रक्तदात्यांचा या संकल्पनेवर आधारित भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. 
नितीन गडकरी म्हणाले, पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदानातून अटलजींना दिलेली ही खरी श्रद्धांजली आहे. अटलजींच्या कविता, भाषणे, विचार यातून देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळत आहे. त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारण मोठया प्रमाणात व्हायला हवे. अटलजी हे खरे राष्ट्रसमर्पित नेतृत्व होते.
लोकांची सेवा करणे हेच खरे समाजकारण आणि राजकारण आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी शोषित, दलितांचा सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा प्रश्न सोडवित इतरांना चांगला विचार आणि प्रेरणा दिली. देश आणि समाजाकरीता जीवन समर्पित करणारे अटलजी होते. आयुष्यभर त्यांनी राष्ट्रभक्तीचा परिपाठ दिला. देशाची प्रतिष्ठा आणि विकासाची चिंता त्यांनी आयुष्यभर त्यांनी केली. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच राजकारणात 80 टक्के समाजकारण करुन शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात मोठे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारतर्फे आयोजित हे शिबीर बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेमध्ये झाले. याच्या उद््घाटनप्रसंगी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांसह अशोक येनपुरे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेश येनपुरे, गायत्री खडके, मुख्य आयोजक नगरसेवक हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.