Pune : रेल्वे पोलिस लाईन बॉईज, हॉकी लव्हर्सचा संघर्षपूर्ण विजय

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक स्मृती निमंत्रित हॉकी स्पर्धेत मंगळवारी दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिस लाईन बॉईज आणिहॉकी लव्हर्स संघांनी संघर्षपूर्ण विजय मिळवून आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली.
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर (Pune) झालेल्या सामन्यात रेल्वे पोलिस लाईन बॉइज संघाने एक्सलन्सी अकादमीचे आव्हान ४-३ असे परतवून लावले. उदय बारामतीकरने १६व्या मिनिटाला लाईन बॉईजचे खाते उघडले. मात्र, दोनच मिनिटांनी आर्यन शेडगेने एक्सलन्सी संघाला बरोबरी साधून दिली.
मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर रोशन मुसळेने ३३व्या मिनिटाला लाईन बॉईजला पुन्हा एकदा आघाडीवर नेले. पण, सुजल मामुनकरने ४२व्या मिनिटाला गोल करून एक्सलन्सी संघाला पुन्हा एकदा बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर वेगवान खेळ करणाऱ्या लाईन बॉईजसाठी ओंकार मुसळेचा खेळ निर्णायक ठरला.
ओंकारने ३८व्या मिनिटाला लाईन बॉईज संघाला तिसऱ्यांदा आघाडीवर नेले. दोनच मिनिटांनी ओंकारने आणखी एक गोल करत लाईन बॉईजची आघाडी भक्कम केली. त्यानंतर एक्सलन्सी संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, त्यांना केवळ एकच गोल करता आला. मनोज रंधवाने ४९व्या मिनिटाला हा गोल केला.
हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब आणि खडकी हॉकी अकादामी या कुमार गटातील संघांमध्ये झालेल्या सामन्यात हॉकी लव्हर्सने ३-२ अशी बाजी मारली.
श्लोक गर्गेने ११व्या मिनिटाला हॉकी लव्हर्सचे खाते उघडले होते. पुढे २०व्या मिनिटाला निझाम शेखने खडकी संघाला बरोबरीवर आणले. पूर्वार्ध १-१ असा बरोबरीतच राहिल्यानंतर उत्तरार्धात अंगीर मंथनने ३५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना हॉकी लव्हर्सला आघाडीवर नेले.
अर्थात, या वेळीही त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. खड़की संघाच्या अक्षय भोसलेने ३९व्या मिनिटाला सामना पुन्हा एकदा बरोबरीवर आणला. सामन्याच्या अखेरच्या सत्रात ५४व्या मिनिटाला स्वप्नील गरसुंडने गोल करून हॉकी लव्हर्सचा विजय निश्चित केला.
आजच्या सामनयासाठी चिखलवाजी यंग बॉईज संघाचा माजी खेळाडू नितिन निकाळजे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
निकाल –
रेल्वे पोलिस लाईन बॉईज ४ (उदय बारामतीकर १६वे, रोहन मुसळे ३३वे, ओंकार मुसळे ३८, ४०वे मिनिट) वि.वि. एक्सलन्सी अकादमी ३ (आयान शेंडगे १८वे, सुजल मामुनकर ४२वे, मनजोत रंधवा ४९वे मिनिट) मध्यंतर १-१
हॉकी लव्हर्स क्लब ३ (श्लोक गर्गे ११वे, अंगीर मंथन ३५वे मिनिट (कॉर्नर), स्वप्नील गरसुंड ५४वे मिनिट) वि.वि. खडकी हॉकी अकादमी २ (निझाम शेख २०वे (कॉर्नर), अक्षय भोसले ३९वे मिनिट) मध्यंतर १-१
आजचे सामने
पूना हॉकी अकादमी वि. खडकी इलेव्हन दु. १.३० वाजता
पुणे (Pune) सिटी पोलिस वि. सेंट्रल रेल्वे,पुणे दु. ३.३० वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.