Chikhali News : नेवाळे वस्तीत आढळले नऊ फुटी 18 किलो वजनाचे अजगर

एमपीसी न्यूज – नेवाळे वस्ती चिखली येथे एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या घरात रविवारी (दि. 3) रात्री नऊ फूट लांबीचे 18 किलो वजनाचे अजगर आढळले. सर्पमित्रांनी त्याला पकफून सुखरूपपणे मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात सोडून दिले. एवढे मोठे अजगर मानवी वस्तीत आल्याने चिखली परिसरात खळबळ उडाली आहे.

किरण नेवाळे हे शेतकरी आहेत. नेवाळे वस्ती येथील त्यांच्या पत्र्याच्या घरात रविवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास साप असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सर्पमित्र वैभव कुरुंद यांना माहिती दिली. वैभव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात भलामोठा अजगर असल्याचे दिसून आले. एकट्याला हे अजगर पकडणे शक्य नव्हते. सुरुवातीला हे अजगर पत्र्याच्या आडूवर बसले होते.

त्यामुळे वैभव यांनी मदतीसाठी सर्पमित्र विशाल पाचंदे, शुभम पांडे, योगेश कांजवणे, राजू कदम यांना बोलावले. त्यानंतर अजगराला पकडण्यात आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. तसेच मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात अजगराला सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आले.

सर्पमित्र वैभव कुरुंद म्हणाले, ‘अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप आहे. नऊ फुटांचा 18 किलो वजनाचा नर जातीचा हा साप असून याचे वय सुमारे सहा ते सात वर्ष एवढे आहे. त्याला नियमित खाद्य मिळाल्यास तो 22 फुटांपर्यंत लांब होतो.

तो 25 वर्षे जगू शकतो. नागरी वस्तीमध्ये अजगर आढळत नाही. डोंगर-दऱ्या, पहाडी भागात तो आढळतो. त्याच्या मादीची 50 ते 60 अंडी घालण्याची क्षमता असते. तसेच हा अजगर निशाचर असल्याने रात्री तो त्याचे सावज शोधत असतो. शेड्यूल वन मधील प्राणी असून याबाबत वनविभागाला माहिती दिली आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.