Pune : अंदाजपत्रकातील सुमारे 10 टक्के कामांचे वर्गीकरण होणार नाही – श्रीनाथ भिमाले

एमपीसी न्यूज – अंदाजपत्रकातील सुमारे 10 टक्के कामांचे वर्गीकरण होणारच नाही. ही तरतूद कोठेही वापरता येणार नसल्याने वर्गीकरणांना ब्रेक लागला आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या पंधरा दिवसात कधीही जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिका सदस्यांनी वर्गीकरणाचा धडाका लावला आहे. अंदाजपत्रकात प्रभागातील ज्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ती कामे होत नसतील तर त्याचे वर्गीकरण करण्यात येते. अन्य कामासाठी प्रभागातच ती तरतूद वापरली जाते. परंतु आता रस्त्याच्या कामासाठी तरतूद केली असेल तर त्याच कामासाठी ती वापरता येणार आहे. नियोजित रस्ता करणे शक्‍य नसेल तर अन्य रस्ते त्या तरतुदीतून करता येऊ शकतात. परंतु रस्त्यासाठी तरतूद केली तर ती ड्रेनेज लाईन किंवा अन्य कामांसाठी वापरता येणार नाही, अशी माहिती सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली. 

अशाप्रकारचे वर्गीकरणाचे प्रस्ताव अनेक सदस्यांनी आणले आहेत. परंतु ते मान्य होणार नाहीत. एकूण अंदाजपत्रकातील सुमारे 10 टक्के तरतुदीचे वर्गीकरण अशाप्रकारचेच आहेत. त्यामुळे ते मान्य होणार नाहीत, असेही भिमाले यांनी स्पष्ट केले.

या आठवड्यात सुमारे सोळाशे निविदा महाईटेंडरवर आणल्या असून, ते लवकरच उघडण्याला सुरूवात होणार आहे. आचारसंहितेच्या आधी या कामांची “वर्क ऑर्डर’ दिली जाईल, असेही भिमाले यांनी नमूद केले.

नियमानुसार महाईटेंडरवर आता या निविदा गेल्याने त्यामध्ये अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. तसेच अधिक स्पर्धा निर्माण होऊन, अधिकाधिक जणांना यामध्ये सहभाग नोंदवता येणार असल्याचे भिमाले यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.